बातम्या
राजर्षी शाहू महाराजांचा चित्ररथ राज्याच्या प्रगतीचा रथ ठरावा - सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार
By nisha patil - 6/3/2024 11:25:45 AM
Share This News:
राजर्षी शाहू महाराजांचा चित्ररथ राज्याच्या प्रगतीचा रथ ठरावा - सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार
एव्हरेस्ट पेक्षाही मोठं काम आणि थोर कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. याचे शब्दातही कल्पनाचित्र करु शकत नाही. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे विचार आजच्या पिढीला कळावेत यासाठी या चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूणच राजर्षी शाहू महाराजांचा हा चित्ररथ राज्याच्या प्रगतीचा रथ ठरावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कोल्हापूर येथून राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील चित्ररथाचे उद्घाटन त्यांचे हस्ते ऑनलाइन झाले, त्यावेळी बोलत होते. या कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. दसरा चौकात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रथाचे पुष्प अर्पण करुन पूजन केले. यावेळी ज्येष्ठ कलावंत राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झालेले शिवशाहीर राजू राऊत, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला कळावे हा या मागील मुख्य उद्देश असून हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे चित्ररथाचे उदघाटन झाले.
राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन कार्यक्रम, योजना, उपक्रम राबविले होते. त्यांची दूरदृष्टी व कल्पकता यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या सकारात्मक घडामोडी घडलेल्या होत्या असे मंत्री मुनगंटीवार यांनी गौरवोद्गार काढले.
पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कमी कालावधीत शेतकरी, गोर गरीब तसेच मागासवर्गीय लोकांसाठी काम केले. सर्व जातीधर्मासाठी बोर्डिंग सुरू केली. शिक्षण, प्रामाणिक न्याय देणाऱ्या राजाने संपूर्ण देशाला आदर्श निर्माण केला. अशा या शाहू महाराजांच्या भूमीतून अल्पसंख्यांक व्यक्ती देखील मंत्रीपदापर्यंत गेला हे भाग्यच असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजर्षी शाहू महाराजांचा चित्ररथ राज्याच्या प्रगतीचा रथ ठरावा - सांस्कृतिक कार्य मंत्री, सुधीर मुनगंटीवार
|