बातम्या

न्यू पॉलिटेक्निकमध्ये 'राजर्षी शाहू टेक सेंटर' सुरू होणार

Rajarshi Shahu Tech Centre will be started in New Polytechnic


By nisha patil - 10/2/2024 11:51:30 PM
Share This News:



कोल्हापूर (प्रतिनिधी) श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमध्ये प्रस्तावित राजर्षी शाहू टेक सेंटरचे लोगो अनावरण चिपळूण येथील होशांग पटेल टेक सेंटरचे प्रमुख डॉ. रंगा बोडावाला यांचे हस्ते झाले. तत्पूर्वी 'प्रिन्स शिवाजी'चे चेअरमन के. जी. पाटील आणि डाॅ. रंगा यांनी या सेंटरच्या उभारणीसाठी सामंजस्य करारावर सह्या केल्या.या करारासाठी आयएसटीई दिल्लीचे चेअरमन डाॅ. प्रतापसिंह देसाई यांचे सहकार्य लाभले.

   या टेक सेंटरमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती करणारे सोलर पॅनल तसेच त्यावर चालणाऱ्या सोलर पंप; टॉर्च; स्ट्रीट लाईट; टेबल लॅम्प इत्यादी उपकरणांचे  उत्पादन होणार आहे. या सेंटरमध्ये न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी त्यांचे प्रकल्प व औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करू शकतील.
या सेंटरच्या उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन तसेच कर्मचारी प्रशिक्षण आदी बाबतीत सहकार्य करू. या सेंटरच्या माध्यमातून नवउद्योजकही तयार होतील असा विश्वास वाटतो असे डॉ. रंगा म्हणाले.

   या टेक सेंटरमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी 'कमवा व शिका' ही योजना राबवून त्यांना सक्षम करू, जेणेकरून असे विद्यार्थी ज्यादा वेळेमध्ये काम करून आपली फी भरू शकतील. तसेच, या टेक सेंटरमधून उत्पादित होणारी उपकरणे वीज उपलब्ध नसलेल्या दुर्गम खेड्यांमध्ये वितरित करण्याचा मानस आहे, असे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे म्हणाले.

   यावेळी आंध्र प्रदेश शासनाच्या सायन्स व टेक्नॉलॉजी विभागाचे माजी संचालक डॉ. पी. व्ही. एस. सुब्बाराव, होशांग पटेल टेक सेंटरचे टेक्निकल ऑफिसर मंथन राणे, 'प्रिन्स शिवाजी' व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननिस वाय. एस. चव्हाण, संचालक आर. डी. पाटील, पी. के. पाटील, विनय पाटील, संचालिका सई खराडे, विभाग प्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.


न्यू पॉलिटेक्निकमध्ये 'राजर्षी शाहू टेक सेंटर' सुरू होणार