बातम्या
राजेश क्षीरसागरांच्या प्रचार यंत्रणेने शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम
By nisha patil - 6/6/2024 9:46:14 PM
Share This News:
कोल्हापूर दि.०६ : कोल्हापूर "उत्तर" शिवसेनेचा बालेकिल्ला.. अपवाद वगळता याठिकाणच्या मतदारांनी नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर "उत्तर" विधानसभा मतदार संघाचा कळीचा मुद्दा उपस्थित होत आहे. एकीकडे राजघराण्याची उमेदवारी, गादीचा मान अशा भावनिक वातावरणात लढल्या गेलेल्या निवडणुकीत शाहू महाराजांनी अपेक्षित विजय मिळविला. लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाचमतदारसंघात शाहू महाराजांना मताधिक्य मिळाले. यात कोल्हापूर शहरातून कॉंग्रेसला आघाडी मिळाली, पण अपेक्षित लाखांच्या मताधिक्यापासून वंचित रहावे लागल्याचे दिसत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राबविलेल्या प्रचार यंत्रणेने शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम लागल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात करवीर, कोल्हापूर दक्षिण, उत्तर, चंदगड, राधानगरी व कागल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली, त्याचवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर, दक्षिण व उत्तरधून काँग्रेस उमेदवाराला मिळणाऱ्या मताधिक्याविषयी भीती व्यक्त केली होती. पण या तीन मतदारसंघातील मताधिक्य चंदगड, कागल व राधानगरीतून भरून निघेल असा अंदाज बांधला जात होता. पण प्रत्यक्ष बालेकिल्ले समजले जाणाऱ्या या तीन मतदारसंघांनीच प्रा. मंडलिक यांना धोका दिल्याचे स्पष्ट झाले. तर शाहू महाराजांना करवीर वगळता उत्तर आणि दक्षिण मधून अपेक्षित असलेल्या मताधिक्यापासून वंचित रहावे लागले.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची कॉंग्रेस कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर मतदारसंघापेक्षा कोल्हापूर उत्तर सह दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच त्यांना लाखोंहून अधिकचे मताधिक्य मिळेल असे वातावरण निर्माण झाले. राजघराण्याविषयीचा आदर, शाहू महाराजांची प्रतिमा या कॉंग्रेसच्या जमेच्या बाजू असल्याने एकतर्फी लढतीचे चित्र निर्माण झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वडिलांच्या निधनामुळे शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेवर मर्यादा होत्या. पण.. वडिलांच्या दिवसकार्याच्या दुसऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राजेश क्षीरसागर यांनी उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील प्रचाराची यंत्रणा हाती घेतली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घटक पक्ष महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोट बांधून प्रचार यंत्रणा सक्रीय केली आणि एकतर्फी वाटणारी ही लढत अटातटीची बनत गेली. यास खुद्द मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी बळ दिले. पेठा- पेठामंधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून जनसंपर्काचा धडाका लावत क्षीरसागर यांनी कॉंग्रेसमय झालेल्या वातावरणाची दिशा शिवसेनेकडे वळविली. प्रचारादरम्यानच्या १५ दिवसांच्या अल्पकालावधीत सुमारे ५० हून अधिक ठिकाणी "मिसळ पे चर्चा", ४५ हून अधिक सभा, ३० प्रचार फेऱ्या यासह व्यक्तिगत गाठीभेटी घेवून प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली. दक्षिणमध्ये महायुतीचा मेळावा घेवून रणशिंग फुंकले. दक्षिण मतदारसंघातही ठिकठिकाणी कोपरा सभा, मिसळ पे चर्चा या माध्यमातून जनसंपर्क साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला देण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा निधी, शिवसेनेची सामाजिक कामे मतदारांच्या मनावर बिंबवण्यात क्षीरसागर एकप्रकारे यशस्वी झाल्याचे दिसून येते. या दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेसला आघाडी मिळाली असली. तरी राजेश क्षीरसागर यांच्या रणनीतीने "उत्तर - दक्षिणेतून" शाहू महाराजांच्या मताधिक्याच्या महामेरुला ब्रेक लागला.
कोल्हापूर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचे मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करून शिवसेनेने कॉंग्रेस कडून हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेतला. त्यानंतर राजेश श्रीरसागर ऊर्जितावस्था दिली त्यातून त्यांना दुसऱ्यांदा विजयी करून उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. मात्र, काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी 'उत्तर' पुन्हा काँग्रेसमय केले. पुढे त्यांच्या निधनानंतर पत्नी जयश्री जाधव यांना मधून 'उत्तर'च्या मतदारांनी विजयी केले यावेळी क्षीरसागर यांचा मोलाचा वाटा असल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांनी मान्य केले होते. मात्र, राज्यातील सत्तेच्या धृवीकरणानंतर पुन्हा एकदा शिवसेने उत्तर कडे लक्ष केंद्रित केले. पुढील विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शिवसेनेचे पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न लोकसभा आंनी शिवसेना अधिवेशनाच्या निमित्ताने केला. कोट्यावधी रुपयांचा निधी देवून विकास कामाला चालना दिली. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेले बळ आणि राजेश क्षीरसागर यांचा जनसंपर्क कोल्हापूर उत्तर सह दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसचे मताधिक्य रोखण्यास यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. कोल्हापूर उत्तरचा विचार करता कसबा बावड्यातील कॉंग्रेसच्या मताधिक्यालाही क्षीरसागर यांनी सुरुंग लावल्याचे दिसते. तर शिवाजी पार्क, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, टाकाळा, शाहूपुरी, साईक्स एक्स्टेंशन, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, शाहू उद्यान, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ येथे मंडलिकाना मताधिक्य मिळाल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने या दोन्ही मतदारसंघातून चाचपणी केली. तर अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने दोन्ही मतदारसंघात कॉंग्रेससाठी धोक्याची घंटी असल्याचे स्पष्ट होत आहे. राजेश क्षीरसागरांच्या रणनीतीने कोल्हापूर उत्तरमध्ये सेनेला उर्जितावस्था मिळाली असून, विधानसभेत पुन्हा भगवा डौलाने फडकविण्याची सुवर्णसंधी आल्याचे मानले जाते.
राजेश क्षीरसागरांच्या प्रचार यंत्रणेने शाहू महाराजांच्या मताधिक्याला लगाम
|