राजकीय
'आमदार आपल्या दारी' द्वारे जनतेचा दारात जाऊन समस्या सोडवणार - राजेश लाटकर
By nisha patil - 11/15/2024 11:15:10 AM
Share This News:
'आमदार आपल्या दारी' द्वारे जनतेचा दारात जाऊन समस्या सोडवणार - राजेश लाटकर
लाटकर याना विधानसभेत पाठवून इतिहास घडवा - तुषार गांधी
कोल्हापूर: धनदांडगे दहशतखोर विरुद्ध जनेतच सर्वसामान्य कार्यकर्ता अशी हि निवडणूक आहे. विरोधी उमेदवारांच्या खंडणी आणि कमिशनला जनता कंटाळली असल्याने उत्तरची भाकरी परतायची वेळ आली आहे. आपल्या मताची किंमत मटणाचे एक ताट आणि हजार-पाचशे रुपयांत करू नका. एकेक मत स्वाभिमानाने आणि सदसदविवेक बुद्धीने द्या. तुमच्या बहुमोल मताच्या जोरावर मी 'आमदार आपल्या दारी' ही योजना सुरू करेन आणि आपल्या दारात येऊन समस्यांचे निराकरण करेन असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले.
यावेळी बोलताना उमेदवार राजेश लाटकर म्हणाले. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ लक्ष्मीपुरीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. तुषार गांधी यांच्या सहभागामुळे प्रेरणा मिळाली असेही लाटकर पुढे म्हणाले. यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले, शासन देत असलेल्या १५०० रुपयांवरून येथील खासदारांनी महिलांचा अपमान केला व धमकी दिली. खरे तर अशा नेत्याने रस्त्यावर निर्भयपणे फिरताना घाबरायला पाहिजे, पण ते असे वक्तव्य करून उजळ माथ्याने फिरत आहेत. हे जर असेच चालले तर आपल्या येथे मणिपूरची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. तुमचेच पैसे तुम्हाला देताना त्यांची धमकीची भाषा असेल तर त्यांना वीस तारखेला मतदानातून दणका द्या असे आवाहन त्यांनी केले. संविधानामध्ये बदल करणारे नाही तर संविधान वाचवणारे सरकार आपल्याला सत्तेवर आणायचे आहे. महायुतीचे सरकार म्हणजे महागद्दार युती आहे.
त्यांनी तुमच्या बरोबर गद्दारी करून भ्रष्ट मार्गाने सरकार स्थापन केले. त्यासाठी प्रत्येकाने ५० खोके घेतले अशी चर्चा जनतेत होते ही राज्याची नामुष्की आहे. जनतेने त्यांच्या पवित्र मताचे महत्त्व जाणून अशा स्वार्थी नेत्यांना कायमचे घरी बसवावे. गांधी यांनी 'लवंगी मिरची मी कोल्हापूरची' या गाण्याचा संदर्भ देऊन सांगितले की, कोल्हापूरची लवंगी मिरची प्रसिद्ध आहे. स्वार्थासाठी आपल्या पक्षाशी गद्दारी करून अख्खे पक्ष पळवून नेऊन महाराष्ट्राची नाच्चकी करणाऱ्या खोकेबहाद्दरांना आणि त्यामागील विघातक शक्तींना ही कोल्हापूरची मिरची झोंबवा आणि मतपेटीच्या माध्यमातून या गद्दारांना घरी बसवा. महाविकास आघाडीची सत्ता आणून मतदारांशी द्रोह करणाऱ्या युती सरकारला पराभूत करा. महाविकास आघाडी म्हणजे 'महा-वफादार' आघाडी असून जनतेने दिलेल्या मताशी ते प्रतारणा करणार नाहीत. महाविकास आघाडीचा जाहिरनामा हा जनतेचा जाहीरनामा असून प्रत्येकाने तो वाचावा आणि मतदान करावे.
राजेश लाटकर या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देऊन कोल्हापूरच्या परंपरेला साजेशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. लाटकर यांना निवडून देऊन जनतेचा आवाज विधानसभेत पोहोचवा असे गांधी म्हणाले. या सभेत दिलीप शेटे, अमर समर्थ, सरलाताई पाटील, भारती पोवार, जितेंद्र सलगर, हर्षद कांबळे, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, तौफिक मुलाणी, प्रतिज्ञा उत्तुरे, पद्मा तिवले, शाहीद शेख, रूपा वायदंडे यांची भाषणे झाली. यावेळी अमर माने, रहीम बागवान, राजू जमादार, संध्या घोटणे, रियाज सुभेदार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'आमदार आपल्या दारी' द्वारे जनतेचा दारात जाऊन समस्या सोडवणार - राजेश लाटकर
|