बातम्या

अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार……राजू शेट्टी.

Raju Shetty


By nisha patil - 5/29/2024 3:17:26 PM
Share This News:



शिरोली ( प्रतिनिधी )  राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलना दरम्यान दिला. 
       

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतक-यांच्यावतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बेंगलोर महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.  
       

एकीकडे सरकारने शेतक-यांवर अन्याय करणारे तुघलकी  निर्णय घेऊ लागले आहेत. तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतक-यांना ऊस बिले अदा करत आहेत याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे. 
 

  यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर , आमदार सतेज पाटील , आमदार अरूण लाड , मा. आमदार संजयबाबा घाटगे , इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांचेसह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.


अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार……राजू शेट्टी.