बातम्या
लोकसभेच्या मैदानात अधिक जोमाने कामाला लागावे - राजू शेट्टी
By nisha patil - 2/20/2024 11:21:21 PM
Share This News:
लोकसभेच्या मैदानात अधिक जोमाने कामाला लागावे - राजू शेट्टी
हातकणंगले (प्रतिनिधी)- गतवेळी झालेल्या चुका विसरून कार्यकर्त्यांनी हातकणंगले लोकसभेच्या मैदानात अधिक जोमाने कामाला लागावे, अशी सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. तसेच यंदाची लढाई ही आरपारची लढाई आहे. सर्वसामान्य जनता आपल्या सोबत असल्याने यंदा आपण यश निश्चितच मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्या वतीने हातकणंगले येथील मंगलमुर्ती मंगल कार्यालय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदाच्या लोकसभेची लढाई ही सर्वसामान्यांची लढाई आहे. ही माझी एकट्याची लढाई नाही. शेती, कामगार, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक यांची अनेक प्रश्ने आपल्याासमोर आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय विदारक झालेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी गतवर्षी ठरल्याप्रमाणे १०० रूपये थकीत बिले देण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. उर्वरीत साखर कारखान्यांनी तातडीने प्रस्ताव द्यावेत, यामध्ये वेळकाढूपणा करू नये, अन्यथा त्या साखर कारखान्यातून साखर बाहेर पडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. मतदारसंघात विकासकामांचा दिखावा करू नये. जी आश्वासने दिली गेली, त्यांची सोडवणूक झाली का? याचा विचार आता जनतेने करावे. यंदाची लोकसभेची निवडणूक मी एक व्होट व एक नोट या प्रमाणेच लढवणार आहे. स्वतंत्रपणे या निवडणुकीत आम्ही उतरणार असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यावा, त्यांना संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरू देऊ नका.
कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे. असे आवाहन शेट्टी यांनी केले. यावेळी जयकुमार कोले, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, मिलिंद साखरपे, सागर संमूशेटे, सचिन शिंदे, आप्पा येडके, आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. राम शिंदे, शैलेश चौगुले, अरूण मगदूम, धनाजी पाटील, श्रीकांत पाटील, विकास चौगुले, आदी उपस्थित होते.
लोकसभेच्या मैदानात अधिक जोमाने कामाला लागावे - राजू शेट्टी
|