बातम्या

राजू शेट्टींचा एल्गार :19 जुलैला विधानभवनावर धडकणार मोर्चा

Raju Shettys Elgar On July 19 a march will be held at Vidhan Bhavan


By nisha patil - 7/18/2023 7:09:53 PM
Share This News:



  गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीसाठी 19 जुलै रोजी मुंबईत आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखला आहे, एकाही अतिक्रमण धारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.बुधवारी 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता हा विशाल मोर्चा आझाद मैदानात होणार आहे. या मोर्चाला राज्यातील प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. बीआरएस, पीसीपीआय, सीपीआय , शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, आरपीआय , एकलव्य सेना, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, सीपीआय सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. या पक्षाचे आमदार देखील या प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडणार आहेत. राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी 19 जुलै रोजी हक्काच्या लढाईसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजर रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

न्यायालय निर्णय नावाने बेदखल करून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे सरकारी षड्यंत्राचा, आम्ही तीव्र निषेध करतो त्याचबरोबर पहिल्यांदा धनदांडग्याची, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने हटवावीत, भूमीहिनांच्या घर व वहिवाटी शेतीहक्काचे संरक्षण करावे, गावरान, गावठाण, वनविभाग जमिनिवरील पिढयानपिढ्या वर्षांनुवर्षे राहते घर व शेती करून पोट भरणाऱ्या भूमिहिनांना जमीन वाटप व्हावे, त्या जमिनीचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रित आले आहेत.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून कोट्यवधी गरीब लोक हे भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद निजामानी सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, बतने, इनाम सोबत दिल्या होत्या. तेच लोक आज अतिक्रमणधारक महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जवळपास साडेपाच लाख कुटूंबेही स्वतःच्या राहत्या घराच्या व वहिवाटी शेतीच्या मालकीपासून कोसो मिल दूर असल्यामुळे सध्या राज्यातील लाखो गोरगरीब भूमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवले आहे.


राजू शेट्टींचा एल्गार :19 जुलैला विधानभवनावर धडकणार मोर्चा