बातम्या
रंगपंचमीः नवरंगांची उधळण करणारा आनंदोत्सव
By nisha patil - 3/30/2024 9:24:05 AM
Share This News:
हिंदू संस्कृतीत फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून आनंदोत्सव साजरा केला जातो. या प्रसंगी विविध रंगांची चूर्णे पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू झालेला होलिकोत्सव फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत साजरा केला जातो. रंगपंचमी साजरी करून होलिकोत्सवाची सांगता केली जाते.
वास्तविक रंग उडविण्याचा उत्सव फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारत आणि अन्य ठिकाणी तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण यासंदर्भात हा उत्सव निगडित असल्याचे मानण्यात येते. धर्मसिंधू या ग्रंथाच्या मते, फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतोत्सव सुरु होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. हा उत्सव वद्य पंचमीपर्यंत साजरा करतात. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे सांगितले जाते.
रंगपंचमीः नवरंगांची उधळण करणारा आनंदोत्सव
|