बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांचे अभिनंदन
By nisha patil - 8/25/2023 7:47:01 AM
Share This News:
राष्ट्रीय पुरस्कारांमुळे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक झाला - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
आपली गुणवत्ता आणि वेगळेपणामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विविध गटांमध्ये बाजी मारणाऱ्या मराठी चित्रपट, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. चित्रपटसृष्टीची जन्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्राने या पुरस्कारांवर आपले नाव कोरून राज्याच्या गौरवशाली कला परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक केला आहे, असे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्र्यांनी काढले.
मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार अर्थात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, यावेळच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत देखील मराठी सिनेसृष्टीनं आपला दबदबा कायम राखला आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अर्थपूर्ण विषय, विषयाचा सखोल अभ्यास, चित्रपट निर्मितीला आधुनिक तंत्रप्रणालीची जोड ह्या साऱ्यांची सांगड घालत अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले, ही कौतुकाची बाब आहे.
यंदाच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट आणि दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परिक्षकांचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला. या यशाबद्दल संबंधित चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञ आदी सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो.
मनोरंजन क्षेत्रातील आपलं वेगळेपण मराठी चित्रपटसृष्टी अशीच कायम अबाधित ठेवेल आणि आपल्या दमदार व चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला असलेली गौरवशाली परंपरा निरंतर सुरु राहील, अशी आशा बाळगतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांचे अभिनंदन
|