बातम्या
"किमान वेतनाच्या मागणीसाठी टिप्पर चालकांचे महापालिकेत निवेदन"
By nisha patil - 12/30/2024 10:07:41 PM
Share This News:
कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांना किमान वेतन न मिळाल्याबाबत महापालिकेत निवेदन देण्यात आले. चालकांनी महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांना दिलेल्या निवेदनात अनेक गंभीर मुद्दे मांडले.
चालकांचा आरोप आहे की, त्यांना केवळ पंधरा हजार रुपयांचा पगार दिला जातो, तोही वेळेवर मिळत नाही. गेल्या आठ महिन्यांत पगारातून दर महिन्याला सुमारे साडेसहा हजार रुपये कपात करून ठेकेदारांनी तब्बल एक कोटी रुपये लाटल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय, सहीसाठी हजेरी पुस्तक उपलब्ध नसणे, डबल ड्युटीचा पगार न मिळणे आणि सात तारखेनंतरही पगारासाठी विनंती करावी लागणे यामुळे चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
"आम आदमी पार्टीने दिला न्याय," असे टिप्परचालकांचे म्हणणे आहे. "आप" पक्षावर झालेले आरोप चुकीचे असून त्यांनी कधीही चालकांकडून पैशांची मागणी केलेली नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
"आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. उद्या जर कामावरून काढून टाकले, तर महापालिकेच्या समोर उपोषणाला बसू," असा थेट इशारा चालकांनी दिला.
यावेळी संजय राऊत, अमर बावडेकर, अजित पाटील, प्रमोद भाले, दत्ता भातखांडे आणि कुमार साठे यांच्यासह अनेक टिप्पर चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"किमान वेतनाच्या मागणीसाठी टिप्पर चालकांचे महापालिकेत निवेदन"
|