बातम्या
प्रयोगशाळा साहित्य खरेदीसह ५ कोटीच्या औषध खरेदी निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By nisha patil - 3/13/2024 4:39:27 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी - जिल्हा परिषद कोल्हापूर येथील जानेवारी २०२४ मध्ये नुकतेच १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त २ कोटींच्या प्रयोगशाळा साहित्य खरेदी, उपकरणांची चढ्या दराने खरेदी प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्थगिती दिल्याचे प्रिंट मिडिया ने प्रकशित केले होते.परंतु स्थगित आदेश असतील तर सदरचे वादग्रस्त खरेदी साहित्य भांडार विभागात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. या प्रकरणी माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि चौकशीत दोषी आढळल्यास दोषींना कठोर शासन होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी १५ व्या वित्त आयोगातून खरेदी करण्यात येणारे प्रयोगशाळा साहित्य निविदा प्रक्रिया चढ्या दराने राबवून जनतेच्या पैशाची उधळण करून काही अधिकारी कर्मचारी संगनमताने एका ठेकेदाराच्या घशात घालून मोठा ढपला पाडण्याचा कट होता.परंतु काही सतर्क आणि निर्भीड लोकांनी वेळीच हा प्रकार चव्हाट्यावर आणल्याने खरेदी प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्थगिती आदेश दिले होते. परंतु काहींच्या हितास्तव स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत हे वादग्रस्त खरेदी साहित्य १५ दिवसांपूर्वीच पुरवठादाराने जिल्हा परिषद भांडार विभागात पोहोच केल्याने जोपर्यंत या खरेदी प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत सदर साहित्य खरेदीच्या बिलाची रक्कम अदा केली जाऊ नये. तसेच दोषींच्या आजपर्यंतच्या त्यांनी राबविलेल्या खरेदी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी व्हावी यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या ५ कोटींची औषध खरेदीची निविदा प्रक्रिया पार पाडली जात असून यामध्ये अनेक धक्कादायक बाबी कानावर पडत आहेत. ५ कोटींच्या औषध खरेदी प्रक्रियेत एका स्थानिक पुरवठादाराने सहभाग घेतला असून या निविदा प्रक्रियामध्ये औषधांचे नमुने घेण्यात आले असून स्थानिक पुरवठादाराने निवेदेमध्ये असलेल्या औषधांचे नमुने औषध निर्माण अधिकारी यांचेकडे प्रमाणित करून पोहोच घेतली असताना सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आले सदर पुरवठा दारांनी याबाबत माहिती मागितली असता त्यांना औषधांच्या नमुन्याचे प्रत्याक्षित दिये नाही असे कारण देण्यात आले. सदरचा नियम म्हणजे मोजक्याच पुरवठादारांना पात्र करण्यासाठी केलेली खटाटोप असल्याचे हि बोलले जात आहे. कारण काही औषध निर्माण अधिकाऱ्यांनी याबाबत तारा न्युज शी
बोलताना असे सांगितले कि औषधांच्या नमुन्याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी ते काही इलेक्ट्रिक उपकरणे आहेत का ? असा संतप्त सवाल करण्यात आला. त्यामुळे ५ कोटींच्या औषध खरेदी निविदा प्रक्रियेमध्ये करण्यात आलेल्या अटींची व शर्तींची माहिती घेतली असता, जे पात्र पुरवठादार आहेत त्यांची छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील झालेल्या गैरव्यवहाराशी तर काही संबंध नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण नुकताच जिल्ह्यात ठपका ठेवण्यात आलेला पुरवठादार सोमवार दि. ११ रोजी जिल्हा परिषदेत येऊन गेल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे त्यामुळे प्रयोगशाळा साहित्यासह ५ कोटींच्या औषध खरेदी प्रक्रियेचीसुद्धा उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे
प्रयोगशाळा साहित्य खरेदीसह ५ कोटीच्या औषध खरेदी निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
|