बातम्या

संजय गांधी योजनेतील निराधार महिलांची बंद केलेली पेन्शन पुन्हा सुरू करा: आ. सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

Resume discontinued pension of destitute women under Sanjay Gandhi Yojana


By nisha patil - 7/20/2023 6:55:20 PM
Share This News:



संजय गांधी योजनेतील निराधार महिलांची बंद केलेली पेन्शन पुन्हा सुरू करा:  आ. सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

संजय गांधी योजनेतील ज्या निराधार महिलांची पेन्शन बंद केली आहे, त्यांची पेन्शन पुन्हा सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केली.याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी दिले.

आ.सतेज पाटील लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतील ज्या निराधार महिलांच्या मुलांचे वय पंचवीस वर्षे पूर्ण झाले आहे, त्या महिलांची पेन्शन बंद करण्यात आली होती. सध्या मुलांच्या वयाची ही अट  शिथिल केली आहे.पण  पेन्शन मिळण्यासाठी या महिलांना पुन्हा फेर प्रस्ताव द्यायला सांगण्यात आले आहे.  निराधार असलेल्या या महिलांना फेर प्रस्तावासाठी  विविध प्रकारचे दाखले पुन्हा गोळा करणे, हे फार अडचणीचे आणि कष्टदायक आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करायला लावणे त्यानंतर संबंधित समितीची बैठक होणे आणि पेन्शन सुरू होणे  याला वेळ जाणार आहे. त्याऐवजी ज्या निराधार महिलांची पेन्शन बंद झाली आहे त्या महिलांचा पेन्शन सुरू करण्याबाबत अर्ज घ्यावा, आणि पेन्शनसाठीच्या यापूर्वीच्या कागदपत्रांच्या आधारे ती पेन्शन पुन्हा सुरू करावी ,तसेच या योजनेतील उत्पन्नाची जी अट आहे ती रद्द करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली .

तसेच पेन्शनची ही रक्कम बँकेतून आणण्यासाठी या निराधार महिलांना वेळेबरोबरच पैसे खर्च करावे लागतात. पूर्वी पेन्शनची ही रक्कम लाभार्थ्यांना घरपोच देण्याचा प्रयोग राज्यात यशस्वी झाला होता, त्याप्रमाणेच पुन्हा एकदा पेन्शनची रक्कम घरपोच देण्याबाबत  कार्यवाही करावी.  तसेच या सर्व लाभार्थ्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करून त्या योजनेचा सुद्धा त्यांना लाभ द्यावा ,अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी या योजनेत  राज्यातील ४१ लाख हून अधिक निराधार महिला लाभार्थी आहेत.या महिलांना बँकेतून पेन्शनची रक्कम काढून आणायला त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे ही पेन्शन त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू तसेच उर्वरित मागण्याबाबतही सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन दिले.


संजय गांधी योजनेतील निराधार महिलांची बंद केलेली पेन्शन पुन्हा सुरू करा: आ. सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी