बातम्या

मुख्याध्यापिका महानंदा कदम यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न

Retirement felicitation ceremony of Principal Mahananda Kadam concluded


By nisha patil - 2/28/2024 4:05:24 PM
Share This News:



कोल्हापूर :  दि.28 :  शाळा- संस्थेसाटी निस्वार्थीपणे आणि त्याग वृत्तीने मुख्याध्यापिका सौ. महानंदा कदम यांनी काम केले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांची शैक्षणिक प्रगती साधत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारून माणगाव शाळेचा कायापालट केला आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, अशी भावना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  सीईओ कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केली.

हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील ए.पी. मगदूम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. महानंदा वसंतराव कदम या चाळीस वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्या. यानिमित्त आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमात सीईओ कौस्तुभ गावडे बोलत होते.  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या सौ. शुभांगी गावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

 

विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. राजेंद्र शेजवळ यांच्या हस्ते मुख्याध्यापिका कदम यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांच्या परिवारातील सुशीलादेवी साळुंखे, प्राचार्य शैलजा साळुंखे, शुभांगी गावडे आणि महानंदा कदम या महिला सदस्या रणरागिनी आहेत. त्यांनी परिस्थितीशी झुंज देत चांगले शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले आहे. मुख्याध्यापिका कदम यांनी घराकडे दुर्लक्ष करून शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे काम केले. शैक्षणिक काम करताना त्यांनी नेतृत्व गुणही दाखवले. माणगाव येथील शाळेचा कायापालट करून दाखवला. या कामी माणगावचे सरपंच राजू मगदूम,  ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. माणगावला इतिहासाची मोठी परंपरा असून या गावात मुख्याध्यापिका कदम यांनी चांगले काम करून आपला ठसा उमटवला आहे अशा शब्दात संस्थेचे सहसचिव राजेंद्र शेजवळ यांनी कौतुक केले.

सरपंच राजू मगदूम म्हणाले, मुख्याध्यापिका कदम यांनी शाळेत मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर चांगले शिक्षण देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. विद्यार्थ्यांच्या अपप्रवृत्तीच्या विरोधात काही वेळा त्यांनी रणरागिणीचा अवतारही धारण केला. त्यांनी शाळेचा अमुलाग्र बदल केला आहे.   संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांनी बापूजी साळुंखे यांच्या माणसे जोडण्याचा गुण मुख्याध्यापक कदम यांनी अवलंबला असल्याने शाळेची प्रगती वेगाने झाली आहे, अशा शब्दात कौतुक केले.  अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या सौ. शुभांगी गावडे म्हणाल्या, सात मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करणाऱ्या महानंदा कदम यांनी स्वतःला घडवत विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारचे घडवण्याचे काम केले आहे. एक सक्षम महिला उत्तम नेतृत्व करते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक कदम यांनी आई विमल साळुंखे,  वडील सूर्याजीराव साळुंखे यांनी केलेले संस्कार आणि भाऊ प्राध्यापक महेश साळुंखे आणि हितेंद्र साळुंखे यांनी सातत्याने दिलेले प्रोत्साहन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या मी स्वतःच्या पायावर उभी रहावी अशी आईची इच्छा होती. माझ्या आईनेच माझा डीएड चा फॉर्म भरला तर संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी मला नोकरी दिली आणि मी शिक्षिका झाले. छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये २५ वर्षे अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हाताखाली काम करायला मिळाले. त्याचा अतिशय फायदा झाला. माणगाव येथे सरपंच राजू मगदूम आणि ग्रामस्थ हे भावासारखे उभे राहिले. तसेच सर्व शिक्षकांनी मदत केल्याने शाळेची गुणवत्ता वाढली. चाळीस वर्षाच्या शैक्षणिक कार्यात मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. डॉक्टर विद्युल्लता नाईक, प्राध्यापक वसंतराव कदम, अक्षय कदम, स्नेहा साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कोजिमाशिचे तज्ञ संचालक  दादा लाड, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष हितेंद्र साळुंखे, शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.महेश साळुंखे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक आर ए भोजकर, एच के पठाण, टी. बी. पाटील, अजित मोहिते उपस्थित होते. पर्यवेक्षक पी आर बिरनाळे यांनी आभार मानले.


मुख्याध्यापिका महानंदा कदम यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न