बातम्या

महसूल हा शासनातील प्रतिनिधित्व करणारा विभाग - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Revenue is the representative department in the government


By nisha patil - 1/8/2023 11:26:19 PM
Share This News:



महसूल हा शासनातील प्रतिनिधित्व करणारा विभाग - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

शासनातील महसूल विभागात नेहमीच नवनवीन बदल, उपक्रम,  नाविन्यपूर्ण प्रशासकिय पद्धती सर्वात आधी राबविल्या जातात. त्यामुळे महसूल विभाग हा इतर विभागांसाठी नेहमीच आदर्श निर्माण करतो, त्यामुळे हा विभाग एक प्रतिनिधित्व करणारा प्रशासनातील घटक आहे असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महसूल दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्यक्त  केले. महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी सुहास गाडे, जिल्हा सहनिबंधक मुद्रांक मल्लिकार्जुन माने, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सुदाम जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महसूल विभागातील गावस्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागातील चांगले काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा देवून प्रमाणपत्र वितरित केले. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाकडून महसूल दिन आता सात दिवस सप्ताह स्वरूपात राबविण्यात येत आहे. येणाऱ्या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या स्तरावर कार्यक्रम घेऊन परस्पर विभागांमध्ये संवाद साधून कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी. यातून जनतेचाही संवाद वाढेल असे कार्यक्रम आयोजित करावेत. पुढील सात दिवसात वेगवेगळ्या कार्यक्रमातून विभागाचे महत्व अधोरेखित होईल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी उपस्थित महसूल अधिकारी कर्मचारी यांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येत्या काळात युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षकांची नेमणूक येत्या काळात होणार आहे. दररोज सकाळी इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना केले. 

अधिकारी कर्मचाऱ्यांनी दैनंदिन काम करत असताना आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे जेणेकरून कामे वेळेत होतील व आपल्या कुटुंबासाठीही वेळ देता येईल. आपण नाविन्यपूर्ण कामामधून आपल्या कामांचा दर्जा व क्षमतांचा विकास साधू शकतो. आपल्या क्षमता वाढविल्या नाही तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या कामासह आपल्या शरीरावर होऊन भविष्यात कौटुंबिक तसेच प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनीच तंदुरुस्त राहून चांगल्या प्रकारे नवनवीन कामातून आपल्या क्षमतांचा विकास करावा असे मार्गदर्शन त्यांनी महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना केले.

या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने अनिल तांदळे, पुरुषोत्तम ठाकूर, अविनाश सूर्यवंशी, विजय जाधव, तहसीलदार अश्विनी वरूटे-अडसूळ, किरण माने, प्रांत अधिकारी वसुंधरा बारवे यांचा समावेश होता.

त्यानंतर उपस्थितांना जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुदाम जाधव, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा सहनिबंधक मुद्रांक मल्लिकार्जुन माने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले. सूत्रसंचालन सरस्वती पाटील तहसीलदार महसूल यांनी केले.


महसूल हा शासनातील प्रतिनिधित्व करणारा विभाग - जिल्हाधिकारी राहुल रेखावार