बातम्या

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

Review of various pending issues by Guardian Minister Hasan Mushrif


By nisha patil - 7/16/2024 9:10:56 PM
Share This News:



जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध गावांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित गावकऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांवर चर्चा करुन आढावा घेतला. हमीदवाडा तालुका कागल येथील 16 कुटुंबांना दिलेले भूखंड त्यांच्या नावे करणे संदर्भात, गावठाण जमिनीची ताबापट्टी लाभार्थ्यांना मिळणेबाबत चर्चा झाली. या अनुषंगाने प्रस्ताव सादर केलेले आहेत, त्यावरती अभिप्राय देऊन राज्यस्तरावर प्रस्ताव द्या, असे निर्देश यांनी महसूल विभागाला दिले. याबाबत मंत्रालय स्तरावरती बैठक आयोजित केली जाणार आहे. ग्रामपंचायत म्हाकवे येथील गावठाण वाडीतील प्लॉट आयुर्वेदिक तालुका दवाखाना म्हाकवे यांना देणेबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. बेलवळे बुद्रुक ता. कागल येथील गावठाण हद्दीतील गावठाण व शेतीचा नवीन डीपी बसवणे बाबत महावितरण विभागाला सूचना केल्या. गावठाणामधील डीपी प्राधान्याने बसविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.  यासाठी आवश्यक निधी जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने दिला जाईल असे ते यावेळी म्हणाले.  तसेच तेथील वर्ग एकची जमीन वर्ग दोन मध्ये करण्यासाठी गावकऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी व विविध कागदपत्रांची माहिती होण्यासाठी मंगळवारी गावात कॅम्प लावा. त्या अगोदर संबंधितास छाननी तक्ता देऊन आवश्यक कागदपत्रांची माहिती द्या, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. 

 

आरोग्य सेवक पुरुष 10 टक्के पदोन्नती संवर्गातील पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरणे बाबत यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस. यांनीही याबाबतची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली. याबाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाला देऊन सोमवारी मंत्रालय स्तरावरती चर्चा करू असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. कागल शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाबाबत तेथील स्थानिक रहिवासी व राष्ट्रीय महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार यांच्यासोबत उड्डाणपुलाच्या डिझाईन बाबत बैठक झाली.  मागील बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला कागल शहरांमध्ये बऱ्याच रहिवाशांना वाहतुकीच्या बदलामुळे अडचणीला सामोरे जावे लागणार असल्याने डिझाईन मध्ये बदल करण्याची विनंती करण्यात आली होती.  यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित कंत्राटदाराला डिझाईन मध्ये बदल करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने संबंधित कंत्राटदाराने आवश्यक बदल करून आजच्या बैठकीत बदलासह नवीन उड्डाणपुलाच्या कामाबाबतची माहिती सादर केली.

 आंबेओहळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना पुनर्वसनाकरिता उच्च न्यायालय मुंबई येथे प्रलंबित असलेल्या 25 प्रकरणांमधून जमीन वाटपास उपलब्ध होणार आहे या जमिनीमुळे जवळजवळ शंभर टक्के शेतकऱ्यांना पर्याय जमीन मिळणार आहे व पुनर्वसनाचे काम संपणार आहे याकरिता भूसंपादन क्रमांक 12 कोल्हापूर यांनी उच्च न्यायालयात इंटरिम एप्लीकेशन दाखल करून सदरच्या प्रकरणातील स्थगिती आदेश उठवणे आवश्यक असल्याबाबतची मागणी संबंधित गावकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. तसेच गावातील खातेदारांनी स्वेच्छा पुनर्वसन दिलेले आहे याबाबतचे सानुग्रह अनुदान मिळावे ही त्यांची मागणी होती. याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाला याबाबतचा अंतरीम अहवाल महसूल देवून पुढिल कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा