बातम्या
कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांचा आढावा
By nisha patil - 12/28/2024 11:26:26 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. २८ : कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शेंडा पार्क येथील २९ एकर परिसरात भव्य आणि सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम सुरू असून, ३० डिसेंबरपासून इमारतींचा प्रत्यक्ष वापर सुरू होणार आहे. यामध्ये १५० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह, शवविच्छेदन गृह, ओडोटोरियम व परीक्षा कक्ष यांचा समावेश आहे.
शेंडा पार्कमधील उभारण्यात येत असलेल्या कॅम्पसमध्ये सर्व रस्ते काँक्रीटमध्ये तयार केले जाणार आहेत. कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी कामांच्या सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
शेंडा पार्क येथील उर्वरीत कामांमध्ये १२५ निवसी व १२५० क्षमतेच्या आंतरवासिता डॉक्टर्स वसतीगृह, मुलींचे व मुलांचे वसतीगृह, परिचारिकांचे वसतीगृह व प्रशिक्षण केंद्र बांधले जाणार असून, १७५ कोटींचे हे काम दोन वर्षात पूर्ण होईल. त्याच ठिकाणी न्यायवैद्यकशास्त्र इमारत व बॅडमिंटन कोर्टचे काम सुरू केले आहे.
सीपीआर इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असून, मार्च २०२५ पर्यंत सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. यावेळी झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. ११०० बेडच्या हॉस्पिटल इमारतीचे काम अद्याप सुरू नाही, याबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक घेऊन कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
कोल्हापूरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांचा आढावा
|