बातम्या

महिला सबलीकरणासाठी भाजप महिला मोर्चाचं क्रांतिकारी पाऊल- चित्रा वाघ

Revolutionary step of BJP Mahila Morcha for women empowerment


By nisha patil - 7/24/2023 4:41:29 PM
Share This News:




भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्यावतीने महिला सबलीकरणासाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केवळ महिलांच्या नावे सहकारी संस्थांची नोंदणी करण्याची संकल्पना पुढे आली. महिलांना केवळ बचतगटापुरते मर्यादित न ठेवता विविध शासकीय ठेकेही त्यांना मिळावेत यासाठी महिलांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करावी आणि विविध कामे मिळवावीत हा यामागचा उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज कोल्हापूर येथे प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते 35 महिला संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडीक, प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, शहर जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी, महिला सबलीकरणासाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे असे नमूद केले. महिलांना केवळ लोणची,पापड, चटणी, गृहउद्योग यामध्ये बांधून न ठेवता खऱ्या अर्थाने उद्योजिका बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीणजी दरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार निव्वळ महिलांची सहकारी संस्था स्थापन करून एक नवा पायंडा या निमित्ताने पाडला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यातून श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या उपक्रमाचा शुभारंभ होतोय ही आनंदाची बाब असल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले. महिलांनी आता अधिक जबाबदारीने आणि चिकाटीने काम करून स्वतःचे नाव उज्वल करावे असे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्षा शौमीका महाडीक यांनी, ही संकल्पना म्हणजे महिलांना खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी असल्याचे नमूद केले. तसेच ग्रामीण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन या संस्था यशस्वीरीत्या व पारदर्शकपणे चालवाव्यात यासाठी आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यवसायांच्या चाकोरी बाहेर जाऊन नवी क्षितिजे गाठण्याची संधी या निमित्ताने महिलांना मिळाली आहे. असे मत गायत्री राऊत यांनी मांडले. सौ. पुष्पा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.


महिला सबलीकरणासाठी भाजप महिला मोर्चाचं क्रांतिकारी पाऊल- चित्रा वाघ