मनोरंजन

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि कुटुंबीयांसह चित्रपट टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’

Rich Chhatrapati Udayanraje Bhosale Maharaj and his family watched the movie Dharmakshak Mahavee


By nisha patil - 11/25/2024 7:31:20 PM
Share This News:



श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि कुटुंबीयांसह चित्रपट टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसह चित्रपटाच्या टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले यांनी केले चित्रपटाचे भरभरून कौतुक 

संदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज  भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची सातारा येथील  जल मंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या ठाकूर अनुप सिंग, निर्माते संदीप मोहिते-पाटील, दिग्दर्शक तुषार शेलार आणि चित्रपटाच्या इतर टीमने जल मंदिर पॅलेसमधील प्रसिद्ध आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाऊन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला नमन करत, देवीची  पूजा करून देवीचे आशीर्वाद घेतले. सोबतच पॅलेसची सैर घडवत असताना उपस्थितांसोबत संवादही साधला. याव्यतिरिक्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या टीमसोबत ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपटही पाहिला. 

चित्रपटाचा ट्रेलरचेही पहिले सादरीकरण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्यासमोर करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या कुटुंबियांसाठी या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले आहे. 

चित्रपटाचे कौतुक करताना राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज  भोसले म्हणाल्या, '' लाजवाब चित्रपट बनला आहे. आजच्या काळात इतिहासाचे जतन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे असे चित्रपट वरचेवर बनले पाहिजेत आणि हे काम संदीप मोहिते-पाटील, तुषार शेलार आणि त्यांच्या टीमने केले आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांचे हे योगदान निश्चितच मोलाचे आहे. आज आमच्यासाठी या शोचे खास आयोजन केले त्यासाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार. चित्रपट तर उत्तम आहेच त्यात भर टाकली आहे ती, कलाकारांनी. प्रत्येकाने आपली व्यक्तिरेखा उत्तम वठवली आहे. प्रत्येकाने हा चित्रपट अवश्य पाहावा.'' 

 महाराणी दमयंती उदयनराजे भोसले म्हणतात, '' या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचे शौर्य आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. चित्रपटातील दिग्दर्शन, संवाद, अभिनय, व्हीएफएक्सचा सुयोग्य वापर या आणि अशा अनेक बाबींमुळे हा चित्रपट अधिकच सर्वोत्कृष्ट बनला आहे. ट्रेलर बघूनच हा चित्रपट पाहाण्याची प्रचंड इच्छा झाली होती आणि अखेर ती पूर्ण झाली.'' 

निर्माते संदीप मोहिते-पाटील म्हणतात, '' सर्वात आधी मी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो की, आज त्यांनी ही संधी आम्हाला दिली. हा आमच्यासाठी खूप खास क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वारसदारांसाठी या चित्रपटाचे खास आयोजन आम्हाला करता आले, यापेक्षा मोठे भाग्य कोणते असूच शकत नाही. ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्यांच्या वारसदारांना हा चित्रपट आवडणे, त्यांच्याकडून कौतुक होणे, हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. खरंतर हा आनंद मी शब्दांत व्यक्त करूच शकत नाही.  या सगळ्या मेहनतीचे चीज झाले. आता प्रेक्षकांनीही असेच आमच्यावर भरभरून प्रेम करावे, इतकीच अपेक्षा.'' 

दिग्दर्शक तुषार शेलार म्हणतात, ''ज्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे, त्यांच्या वारसदारांनी हा चित्रपट पाहिला आणि तो त्यांच्या पसंतीसही उतरला,  हे सगळेच स्वप्नवत आहे. हा क्षण अत्यंत भावनिक आहे. सध्या प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे. आज या पवित्र स्थळी येऊन, या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा चित्रपट नक्कीच देशभरात नक्कीच यशस्वी होईल,  याची खात्री आहे.'' 

 संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती शेखर मोहिते-पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम, आणि केतन राजे भोसले यांनी केली आहे. चित्रपटात अभिनेता ठाकुर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळेल. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट मराठीत प्रदर्शित झाला असून येत्या २९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशात हिंदी भाषेतव प्रदर्शित होणार आहे.


श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि कुटुंबीयांसह चित्रपट टीमने पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’