बातम्या
"नमो शेतकरी महासन्मान"ची योग्य अंमलबजावणी व्हावी -आमदार ऋतुराज पाटील यांची मागणी
By nisha patil - 12/16/2023 5:09:44 PM
Share This News:
कोल्हापूर "नमो शेतकरी महासन्मान" योजनेंतर्गत लाभार्थी यादीतील एकूण ९६,८११ लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न नसल्याने या लाभार्थीना सदर योजनेचा लाभ अदा होऊ शकला नाही. पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेपासून अनेक शेतकरी वंचित असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुंडे यांनी हि माहिती दिली.
आमदार ऋतुराज पाटील यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे या मुद्द्यावर लक्ष वेधले. "नमो शेतकरी महासन्मान" योजनेची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे झाली नाही हे खरे आहे काय?, अपूर्ण माहिती, ई-केवायसी, आधार लिंक नसणे, त्रुटींची पूर्तता वेळेत न करणे, कागदपत्रांची पूर्तता करुनही अनुदान न मिळणे आदी तांत्रिक कारणांमुळे शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. ई-केवायसी व आधार लिंक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत न झाल्यास हा लाभ बंद होणार आहे का? याबाबत शेतकऱ्यांनी विविध स्तरावर केलेल्या तक्रारीवर कोणती कार्यवाही केली असे सवाल आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित केले.
या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पी. एम. किसान योजनेतील १४ व्या हप्त्याचा लाभ प्राप्त झालेल्या लाभार्थीना दिनांक २६ ऑक्टोबर, २०२३ रोजी वितरीत करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त १४ व्या हप्त्यातील लाभार्थी यादीतील एकूण ९६,८११ लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न नसल्याने या योजनेचा लाभ अदा होऊ शकला नाही. सदर पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठीची कार्यवाही प्रगतीत आहे.
राज्यात १ मे २०२३ पासून विशेषतः ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न न केलेल्या लाभार्थीसाठी गावपातळीवर मोहीम राबवली जात आहे. योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक असून त्याची पूर्तता लाभार्थीनी स्वतः करायाची आहे. याची पूर्तता केलेल्या लाभार्थीचा योजनेचा देय लाभ बंद न होता केंद्र शासनाकडून पूर्ववत केला जातो, अशी माहिती मुंडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
"नमो शेतकरी महासन्मान"ची योग्य अंमलबजावणी व्हावी -आमदार ऋतुराज पाटील यांची मागणी
|