बातम्या

कौशल्य प्रशिक्षणात गोशिमाची भूमिका महत्वाची - आमदार ऋतुराज पाटील

Role of Goshima in skill training is important


By nisha patil - 9/18/2023 9:09:13 PM
Share This News:



ज्याच्याकडे कौशल्य असते त्यांना नोकरीची संधी आपसूकच उपलब्ध होते. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजेच 'गोशिमा'च्या अद्ययावत स्किल सेंटरच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षणाची संधी कोल्हापुरातील युवा पिढीला उपलब्ध करून दिली आहे,  ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. याप्रमाणेच 'मिशन रोजगार'साठी सुद्धा गोशिमाने सहकार्य करावे अशी भूमिका आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडली. 

    आमदार ऋतुराज पाटील गोशिमाच्या स्किल सेंटरला भेट देऊन पदाधिकारी व संचालकांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, सध्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये नवनव्या संकल्पना येऊ घातल्या आहेत.  बदलत्या तंत्रज्ञानामुळे त्या प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ हे उद्योगांना आवश्यक असते. याची दखल घेऊनच गोशिमाने जे स्किल सेंटर सुरू केले आहे, त्यामुळे उद्योगांना कुशल प्रकारचे प्रशिक्षण मनुष्यबळ मिळण्यास निश्चितपणे फायदा होईल. 'मिशन रोजगार' च्या माध्यमातून कोल्हापुरातील युवा पिढीला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला या स्किल सेंटर मुळे चांगले पाठबळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे यांनी मिशन रोजगारचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व कोल्हापूरच्या युवा पिढीला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणार असल्याचे नमूद केले.

 या बैठकीवेळी सेंटर ऑफ एक्सलांसचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, नितीनचंद्र दलवाई, रणजित मोरे, अमोल यादव,योगेश कुलकर्णी, मोहन पंडितराव, प्राचार्य डॉ महादेव नरके, डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.


कौशल्य प्रशिक्षणात गोशिमाची भूमिका महत्वाची - आमदार ऋतुराज पाटील