बातम्या

संजय पाटील यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

Sanjay Patil appointed as Joint Managing Director of Maharashtra Film


By nisha patil - 9/13/2023 9:07:57 PM
Share This News:



 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी संजय पाटील  यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी नुकताच या पदाचा पदभार स्वीकारला आहे. याआधी ते राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे कोल्हापूर  चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. 

संजय पाटील यांना प्रशासकीय सेवेच्या अनुभवासह चित्रपट ,रंगभूमी  आणि सांस्कृतिक क्षेत्राचाही प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, पु.ल.अकादमीचे प्रकल्प संचालक, राज्य कर उप आयुक्त आदी पदावर त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे.

 
संजय पाटील यांची लेखक, कवी, गीतकार, संवादलेखक आदी क्षेत्रातही चतुरस्त्र मुशाफिरी असून त्यांनी 'जोगवा', 'दशक्रिया', 'बंदिशाळा', 'पांगिरा' या चित्रपटांसाठी पटकथा, संवादलेखन, आणि गीत रचना केलेली आहे. तसेच '72 मैल एक प्रवास' या चित्रपटाचे गीतलेखन आणि संवादलेखन तर 'हिरकणी' व 'रेती' चित्रपटाचे  गीतलेखन केले आहे. वरील त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

संजय पाटील यांचे 'आभाळ झेलण्याचे दिवस', 'हरवेलेल्या कवितांची वही', 'दशक्रियेची चित्रकथा', 'शून्य प्रहर', 'लेझीम खेळणारी पोरं','मायलेकी' अशी सहा  पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 'हरवेलेल्या कवितांची वही' या कवितासंग्रहाला कवियत्री इंदिरा संत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'लेझीम खेळणारी पोरं' या कवितासंग्रहाला तुका म्हणे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार, बालकवी ठोंबरे पुरस्कार, आरती प्रभू पुरस्कार, विशाखा काव्य पुरस्कार अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच साहित्य क्षेत्रात आजवर केलेल्या कामगिरीसाठी 'यशवंत सन्मान' पुरस्कराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य शासनातर्फे दिला जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट गीतलेखनाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या कै.ग.दि. माडगूळकर या पुरस्काराने चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.


संजय पाटील यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती