बातम्या

तपोवन मैदानावर २२ डिसेंबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी प्रदर्शन

Satej Agriculture Exhibition


By nisha patil - 12/20/2023 10:59:39 PM
Share This News:



तपोवन मैदानावर २२ डिसेंबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी प्रदर्शन
-प्रदर्शनात अडीचशे स्टॉल, पशुपक्ष्यांचा सहभाग,
-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, तज्ञांचे होणार मार्गदर्शन
-आमदार सतेज पाटील यांची माहीती

कोल्हापूर: शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’आयोजित करण्यात येते. यावर्षीचे हे पाचवे प्रदर्शन २२ ते २५ डिसेंबर २०२३ या कालावधीत तपोवन मैदान येथे होणार आहे. यामध्ये अडीचशे हून अधिक स्टॉल, दोनशे पेक्षा अधिक पशु पक्षी जनावरे यांचा समावेश असल्याची माहिती विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

आमदार सतेज पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उदघाटन २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. असून देश - विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामध्ये तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, २०० पेक्षा अधिक पशु-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बि-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.
           

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलिमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, डी.वाय. पाटील ग्रुप,संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बि-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले, स्काय स्टार इव्हेंटचे स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत. या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत. 
 प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.  तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना शेतीभूषण पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार आणि कृषी विभागाच्या वतीने उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा पशुस्पर्धांची बक्षीसही दिले जाणार आहेत. आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे. तांदूळ महोत्सवात आजरा घनसाळ, 
रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी अशा नमुन्यांचे तांदूळ शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन आणि हायड्रोलिक चारा तयार करणे, विविध प्रकारचे जनावरे पशुपक्षी पहावयास मिळणार असल्याची माहिती आ. सतेज पाटील यांनी दिली आहे.


आयोजित व्याख्याने
२३ डिसेंबर २०२३
श्री. मंगेश किसन भास्कर यांचे नैसर्गिक शेती (दहा ड्रम तंत्रज्ञान) या विषयावर, डॉ. नरेंद्रकुमार जे. सुर्यवंशी यांचे फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर तर डॉ. परिक्क्षीत देशमुख यांचे दुग्धव्यवसायात जीनोमिक सेक्ससेल सिमेनचे महत्व या विषयावर व्याख्याने होणार आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
२४ डिसेंबर २०२३
डॉ. आबासाहेब साळुंखे शाश्वत ऊस उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. अशोक पिसाळ यांचे टंचाई सदृश्य स्थितीत पिकांसाठी पाणी व्यवस्थापन, डॉ. योगेश गंगाधर यांचे वनपौष्टीक भरडधान्य उत्पादन तंत्रज्ञान तरश्री. सत्यजित विजय भोसले यांचे प्लॉस्टिकल्चर - नवयुगातील शेतक-यांचे आधुनिक साधन या विषयावर व्याख्याने होणार आहेत.


तपोवन मैदानावर २२ डिसेंबर पासून पश्चिम महाराष्ट्रातील भव्य "सतेज कृषी प्रदर्शन