बातम्या
सांगली बाबतीत लवकरच चांगला निर्णय सतेज पाटील यांनी सांगितले
By nisha patil - 10/4/2024 6:54:11 PM
Share This News:
सांगली बाबतीत लवकरच चांगला निर्णय आ. सतेज पाटील यांनी सांगितले
कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर : प्रतिनिधी भाजपकडून काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे. हा एक जनतेचं मन विचलित करण्याचा प्रयत्न आहे. देशपातळीवर फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे आहे. भाजपाने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे, त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही अशा शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे यांनी यू टर्न घेतला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बदललेल्या भूमिकेचे राज्यातल्या जनतेला देखील आश्चर्य वाटतं आहे. राज ठाकरे महायुतीमध्ये जाऊन दोन-चार जागा लढवतील असं वाटलं होतं. मात्र, निवडणूकच लढवायची नाही ही भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मान्य झाली असेल असं वाटत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांच्यामध्ये इतकं का परिवर्तन झालं हे कळायला मार्ग नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, राज्यात फोडाफोडीचं राजकारण झालं त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वक्तव्यं संपूर्ण जनतेने ऐकली आहेत. महाराष्ट्रातील गढूळ वातावरणाचा समाचार राज ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, राज ठाकरे यांनी यू टर्न घेतल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.
सांगलीतील नाराजी एकत्र बसून दूर करू : महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बसून सांगलीच्या बाबतीत असलेली नाराजी दूर करू. भविष्यकाळात सांगलीमध्ये काँग्रेसचा सन्मान कसा राहील याबद्दल प्रयत्न केला जाणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतली असून, सांगलीसह 48 जागांचा अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे सांगलीमधील नाराजी आम्ही सर्वजण एकत्र बसून दूर करू. राज्यात तिन्ही पक्ष एकदिलाने काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळेल, काही दोन चार ठिकाणी नाराजी असते. ती दूर केली जाईल असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत. सध्या भाजपाला थांबवणं हेच आमच्या सगळ्यांचं एकमेव ध्येय आहे. महाविकास आघाडी म्हणून चर्चा झालेली आहे. काँग्रेस कुठेही एकाकी पडली नाही. काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांच्या टीकेला किती महत्व द्यायचं? कारण अशोक चव्हाण देखील त्या बैठकांना उपस्थित असायचे त्यामुळे या गोष्टीला काही महत्व नाही असंही पाटील म्हणाले.
आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत : काँग्रेसला टार्गेट करून नागरिकांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशपातळीवर फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे आहे. भाजपाने पक्ष फोडण्याचा ट्रेडमार्क घेतला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कुणाला लागू होऊ शकत नाही. माझ्यावर सगळ्यांचं जास्त प्रेम आहे, त्यामुळे माझ्यावर टीका होत आहे. कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या निमित्ताने दिल्लीला पाठवायची आहे. लोकांच्या मनामध्ये काँग्रेस आणि शाहू महाराज हे फिक्स झाले आहेत. जनतेनं ठरवलं आहे खासदार बदला परिस्थिती बदलेल. खासदार बदला कोल्हापूर बदलेल हाच हट्ट कोल्हापूरकरांनी धरलेला आहे. आम्ही पण इथलेच आहोत. आम्ही पण कोल्हापूरचेच आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रत्येक तालुक्यात कार्यालय हा उपक्रम राबवला जातोय. पाच वर्षात विद्यमान खासदार संजय मंडलिक करू शकले नाहीत म्हणून, ते आता टीका करत आहेत, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
याच अजिंक्यताराचा रोल 2019 साली काय होता : लोकांच्या मनामध्ये महाराजांबद्दल असलेली आपुलकी आणि प्रेम ते काढू शकत नाहीत. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजकारणाचा अभ्यास जास्त आहे. पुण्यात 'हू इज धंगेकर' म्हटले होते. त्याचा परिणाम पुढे पाहायला मिळाला. भाजपाची बिहारमध्ये आणि दक्षिण भारतामध्ये काय अवस्था होणार ही आकडेवारी समोर आहे. मात्र, स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 400 पारचा नारा द्यावा लागतो. भाजपा 214 च्या वर जात नाही ही देशपातळीवरची आकडेवारी आहे. कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवावं लागतं. त्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा प्रामाणिकपणे करत आहेत. कोल्हापूरमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ प्रचाराला आले तरी त्याचा परिणाम पाहायला मिळणार नसल्याचा ठाम विश्वास सतेज पाटलांनी यावेळी स्पष्ट केला आहे.
सांगली बाबतीत लवकरच चांगला निर्णय सतेज पाटील यांनी सांगितले
|