बातम्या
एरंडोल येथील वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण
By nisha patil - 7/28/2023 5:37:22 PM
Share This News:
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण काळजीवाहकानेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत बुधवारी सरकार पक्षातर्फे स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरुन काळजीवाहक तसेच काळजीवाहकाला साथ देणाऱ्या त्याची पत्नी वसतिगृहाच्या अधीक्षका तसेच सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पीडित मुलींना बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.काही महिन्यांपूर्वी नाशिकला खासगी वसतिगृहात मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. ही चांगलीच चर्चेत आली होती. त्यातच एरंडोल येथील प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेश शिवाजी पंडित असे या मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजीवाहकाचे नाव आहे.
एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खाजगी संस्थेचे मुलींचे वसतिगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वसतिगृह बंद पडल्यानंतर या वसतिगृहात दाखल पाच मुलींना जळगाव येथील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आल्या. येथील वातावरणात स्थायिक झाल्यानंतर या मुलींनी बाल सुधारगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वसतिगृहात दाखल असताना तेथील काळजीवाहकाने लैंगिक अत्याचार केल्याबाबतची माहिती दिली.
हे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर जळगाव बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांनी एरंडोल पोलिसांना पत्र दिले होते. त्यानुसार या गंभीर प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन एरंडोल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. 2022 ते वसतिगृह बंद होईपर्यंत म्हणजे वर्षभर मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा काळजीवाहक गणेश पंडित याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधीक्षक आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
एरंडोल येथील वसतिगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण
|