राजकीय
गद्दार हसन मुश्रीफांना शंभर टक्के पाडा: शरद पवार यांचे प्रतिपादन
By nisha patil - 11/16/2024 11:09:46 PM
Share This News:
गद्दार हसन मुश्रीफांना शंभर टक्के पाडा : शरद पवार यांचे प्रतिपादन
: समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे रेकॉर्डब्रेक सभा
गडहिंग्लज / प्रतिनिधी ईडीच्या समोर आपल्या केसेस पुन्हा ओपन होतील. याची चिंता ज्यांना आहे. तेच लोक तुम्हाला आम्हाला सोडून गेले. तिकडे गेले आणि निर्लज्जपणे सांगताहेत पवारसाहेबांना विचारून आम्ही गेलो." झक मारायची, अन दुसऱ्याचे नाव घ्यायचे" ही गोष्ट आम्ही कदापिही मान्य करणार नाही. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा.त्यांच्यापैकीच एक हसन मुश्रीफ आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत या गद्दार हसन मुश्रीफांना पाडलंच पाहिजे.... पाडलंच पाहिजे.. पाडलंच पाहिजे.... अशा शेलक्या शब्दात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गद्दारीचा समाचार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतला.
गडहिंग्लज येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट परिवर्तन महासभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज होते.
शरद पवार पुढे म्हणाले, " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये बदल करण्यासाठी महायुतीला ४०० पार खासदार हवे होते. आम्ही लोकसभेला हा प्रयत्न हाणून पाडला.आम्ही जागे आहोत, चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही. देशावर संकट येऊ देणार नाही, कारण तुम्ही सारे आमच्यासोबत आहात. लोकसभेत धक्का बसला म्हणून बहिणींवर प्रेम उफाळून आलं. आज राज्यातील महिलांवर अत्याचार वाढले असताना त्याकडे सरकारचे लक्ष आहे का? भगिनींची काळजी घेऊ न शकणारे हे सरकार सर्वसामान्यांचे, लाडक्या बहिणींचे राज्य आहे का? परस्त्रीला मातेसमान मानायला शिकवणाऱ्या छत्रपती शिवरायांची संस्कृती आपली संस्कृती आहे.
चारित्र्य स्वच्छ असेल तर पळून जावे लागत नाही. आमच्याही मागे ईडी लागली होती. मात्र आम्ही घाबरलो नाही आणि पळुनही गेलो नाही. मी ईडीकडे गेलो तर ते म्हणाले, चूक झाली, तुम्ही येऊ नका. आणि हे तुरुंगात जावे लागू नये, म्हणून पळून गेले. ईडीची फाईल फक्त कपाटात ठेवली आहे, बंद नाही झाली. जेव्हा पुन्हा उघडेल, तेव्हा तुरुंगात जावंच लागेल. आज ना उद्या हे लोक तुरुंगात जाणारच आहेत. ही मंडळी मात्र ईडीच्या कारवाईच्या भितीने पूर्णपणे घाबरलेली आहेत.
मला अभिमान वाटतो, साऱ्या देशाने स्वीकारले, असे महापुरुष या भूमीत जन्माला आले. कोल्हापूर हा ऐतिहासिक वारसा जपणारा राजर्षी शाहू महाराजांचा विचार जपणारा असून देशाने त्यांचे सूत्र स्वीकारले असून जातपात, धर्मभेद हा देश पाळत नाही.
यातूनच अल्पसंख्यांक समाजाचे नेतृत्व करतील, म्हणून मुश्रीफ यांना संधी दिली, पण त्यांनी हा विचार जपला नाही. तुमच्याकडे सुशिक्षित आणि चारित्र्यवान समरजीतसिंह घाटगे हे उमदेवार आहे. महाराष्ट्राला योग्य दिशेने नेण्याची जबाबदारी आता आपली असून यासाठी येत्या २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून समरजीतसिंह घाटगे व नंदाताई बाभुळकर यांना विजयी करा."
यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले,कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरमध्ये समरजितसिंह घाटगे गेल्या अनेक वर्षांपासून कोणतंही पद नसताना जनतेची कामे करत आहेत. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे, हे आता चालणार नाही. येत्या काळात शाश्वत विकासावर भर दिला जाईल. स्वतः उच्च शिक्षित असणारे समरजितसिंह घाटगे आणि महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराज,शाहू, फुले, आंबेडकरी विचार जपत आहेत. त्यामुळे विजय आपलाच आहे.असा विश्वास व्यक्त केला."
महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे म्हणाले," ही निवडणूक देशाचे वस्ताद शरदचंद्रजी पवार विरुद्ध पालकमंत्री मुश्रीफसाहेब अशी आहे. पालकमंत्री मुश्रीफ म्हणायचे पवार साहेब माझे विठ्ठल! मग किती विठ्ठल बदलणार आहात तुम्ही?आज ज्यांच्या ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ते सगळे एका मंचावर आहेत. यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे.
मुश्रीफ जिथं राहतात, तिथं बोगस मतदान का? मुश्रीफांना शासकीय योजनांचा गैरवापर का करावा लागतो. २५ वर्षे खूप कामे केली म्हणता तर भाड्याने वासुदेव आणायची गरजच काय? मला माहित आहे, ही जनता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भूमी काय आहे हे दाखवण्यासाठी सज्ज झालेली आहे.
मुश्रीफांनी आज आजरा कारखाना, गडहिंग्लज कारखाना जाणून बुजून बंद पाडायचा प्रयत्न केला, कारण इकडचा ऊस त्यांच्या कारखान्याला गेला पाहिजे.इथून पुढे स्वाभिमानी जनता हे खपवून घेणार नाही. ईडीची धाड पडल्यावर यांचे प्रामाणिक कार्यकर्ते पुढे आले आणि पोलिसांना भिडले, पण पालकमंत्री साहेबांनी काय केलं?मागच्या दरवाजाने पळून गेले आणि लोटांगण घातलं. हीच का निष्ठा, हाच का प्रामाणिकपणा?
विकासाचे पुस्तक काढले, त्याबद्दल मुश्रीफ साहेबांचे आभार! स्वतःचा खोटेपणा स्वतः दाखवल्याबद्दल धन्यवाद! जे लोक जोमकाईसारख्या धार्मिक ठिकाणी पैसे खातात, त्यांना धक्का बसणारच. शेवटच्या पाच दिवसांत उद्योग करण्याची त्यांची पीएचडी आहे. पण आता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, आपल्या पिढीच्या सक्षमीकरणासाठी, समरजित घाटगेसाठी नव्हे, तुमच्या स्वतःसाठी मतदान करा."
जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी म्हणाल्या, " एक नोटीस आल्यावर सरळसरळ आपल्या नेत्याला सोडून मुश्रीफ साहेब पळून गेले .आज त्यांचेच दलाल मनमानी कारभार करत गडहिंग्लज शहरातील मोक्याच्या जागा विकत घेत आहेत.जो सर्व कांही देणाऱ्या बापाच्या वयाच्या आपल्या नेत्याचा होऊ शकला नाही, तो मायबाप मतदारांचा काय होणार ? या गद्दारांना धडा शिकवायची वेळ आता आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझ्यासह ही स्वाभिमानी जनता समरजितदादांना विजयी करण्यात गडहिंग्लज-उत्तूर विभाग सर्वात पुढे असेल."
यावेळी आर के पवार, डॉ प्रकाश शहापूरकर, प्रा. किसनराव कुराडे, संजय पवार शिवाजी खोत, सुकुमार कांबळे, अकबर मांडवीकर, शिवाजी मगदूम, प्रमोद हर्षवर्धन, अभिषेक शिंपी, अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
गद्दार हसन मुश्रीफांना शंभर टक्के पाडा: शरद पवार यांचे प्रतिपादन
|