बातम्या
शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत
By nisha patil - 11/22/2023 4:46:09 PM
Share This News:
निवडणुकीच्याकाळात पवार कुटुंबातील जिव्हाळा दिसून आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधी पुण्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी त्यानंतर बारामतीच्या गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. पण नजीक भविष्यात या दोन्ही गटांमध्ये सर्वकाही सुरळीत होण्याची चिन्ह दिसत नाहीयत. त्याच कारण आज दिल्लीत घडलेली एक घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असताना प्रफुल पटेल हे सतत शरद पवार यांच्यासोबत दिसायचे. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी प्रफुल पटेल यांची ओळख होती. शरद पवार सुद्धा कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी प्रफुल पटेल यांच्यासोबत चर्चा करायचे. पण काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ असे दिग्गज नेतेही सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये काही भेटी-गाठी झाल्या. त्यावरुन राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, असा कयास लावला गेला. पण असं झालं नाही. आता शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
प्रफुल पटेल यांचं राज्यसभेच सदस्यत्व रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं थेट राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. 4 महिन्यांपूर्वी दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षविरोधी कृती केल्यामुळे कारवाई करण्यासाठी मागणी करून देखील कारवाई न झाल्यानं शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे याआधी वंदना चव्हाण यांच्याकडून राज्यसभेचे सभापती जयदीप धनकड यांना पत्राच्या माध्यमातून आठवण देखील करून देण्यात आली होती.
वंदना चव्हाण यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळानं उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांची भेट घेतली. चार महिन्यांपूर्वी आम्ही पत्र दिलेलं, त्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही, याबाबतही धनकड यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत
|