बातम्या

शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत ....

Sharad Pawar preparing to strike a masterstroke


By nisha patil - 2/13/2024 7:42:53 PM
Share This News:



काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राज्यसभा निवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी एका जागेवर काँग्रेसकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु होती. परंतु, आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला सहजपणे मिळू एका जागेवरही भाजपकडून विरोधात उमेदवार दिला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीसमोर संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्याकडून एक मास्टरस्ट्रोक खेळण्यात आला आहे.

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी मविआकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या नावासाठी आग्रह धरला आहे. सध्या मविआ आघाडीत सर्वाधिक आमदार असल्याने काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, शरद पवार यांनी आता ऐनवेळी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्याची दाट शक्यता आहे.  त्यामुळे आपल्याला उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास तो मास्टरस्ट्रोक ठरु शकतो हे नक्की ..


शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत ....