बातम्या
बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारांची महादेव जानकर यांच्या शी तह
By nisha patil - 4/3/2024 2:36:39 PM
Share This News:
बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारांची महादेव जानकर यांच्या शी तह
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबात लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपापल्या पद्धतीने रणनीती आखत आहेत.त्यामुळे बारामतीत नेमके कुणाचे पारडे जड, हे सांगणे कठीण असले तरी शरद पवारांनी एक-एक पत्ते बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. बारामतीचा गड राखण्यासाठी पवारांनी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी तह करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बारामतीसह माढा लोकसभेचीही लढत लक्षवेधी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
बारामतीतील गोविंद बाग येथील निवासस्थानी पवारांनी आज रविवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वाटाघाटीची कल्पना दिली. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्यांची महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली ताकद आहे. तसेच रासपचे महादेव जानकर सोबत आले तर त्यांचे देखील स्वागत आहे. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची माझी तयारी आहे, असे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
वंचितबाबत पवार म्हणाले...
वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायला हवे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेण्याची माझी इच्छा आहे. महाराष्ट्रातील 27 लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली ताकद असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाची विशेष बैठक होणार आहे. त्यामध्ये ही चर्चा होईल, असे पवारांनी स्पष्ट सांगितले. तसेच महाविकास आघडातीत अद्याप जागावाटप ठरलेले नाही. त्यामुळे विविध माध्यमांमधून होणाऱ्या जागावाटपाच्या चर्चेत तथ्य नसल्याचेही पवारांनी सांगितले.
महादेव जानकरांशी तह?
चर्चेदरम्यान महादेव जानकर व त्यांच्या पक्षाबाबत छेडले असता पवार म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाने या प्रक्रियेमध्ये सोबत असायला हवे. माढा लोकसभा मतदारसंघामधून मी प्रतिनिधित्व केले आहे. हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे. सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत मुंबई येथे बैठक होणार आहे. त्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचे हे सूत्र ठरणार आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
बारामतीचा गड राखण्यासाठी शरद पवारांची महादेव जानकर यांच्या शी तह
|