बातम्या
शरद पवार आज रात्री अमित शाह यांना भेटणार, दिल्लीत मोठ्या घडामोडी?
By nisha patil - 12/14/2023 3:27:29 PM
Share This News:
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्याच बरोबर ओबीसी नेतेही आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे कांदा आणि साखरेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अवकाळी परिस्थितीमुळे शेतकरी खचला आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, शरद पवार अचानक शाह यांना भेटणार असल्याने या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतरची पवार-शाह यांची ही भेट असल्याने त्यावर तर्कवितर्कही वर्तवले जात आहेत.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज रात्री उशिरा अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राजेश टोपेही असणार आहेत. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी यामुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्यात बंदी उठवण्याची शरद पवार मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निकालानंतरची भेट
या भेटीत देशातील विविध समस्यांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकते, असंही म्हटलं जातंय. पण ही राजकीय चर्चा काय असेल हे गुलदस्त्यात आहे. या भेटीनंतर शरद पवार हे मीडियाशी संवाद साधण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अमित शाह यांची भेट होणार आहे. त्यामुळेही या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शरद पवार आज रात्री अमित शाह यांना भेटणार, दिल्लीत मोठ्या घडामोडी?
|