मनोरंजन

शहनाई' हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारतात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा

Shehnai was the first movie released in independent India on 15 August 1947


By nisha patil - 11/8/2023 4:02:25 PM
Share This News:



15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा उत्सव साजरा करण्यासाठी बॉलिवूडनेही या दिवशी 'शहनाई' हा सिनेमा प्रदर्शित केला. खरे तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदर्शित झालेला 'शहनाई' हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरला.
एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळत होतं तर दुसरीकडे त्याच दिवशी 'शहनाई' हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेप्रेमींनी सिनेमागृहात चांगलीच गर्दी केली होती. पीएल संतोषी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात अभिनेता किशोर कुमार मुख्य भूमिकेत होता. तसेच कुमकुम, इंदुमती, राधाकृष्णम आणि रेहाना हे कलाकारही सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते.

स्वतंत्र देशात प्रदर्शित झालेल्या 'शहनाई' या पहिल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा सिनेमा पाचव्या क्रमांकावर होता. रामचंद्र यांनी या सिनेमाला संगीत दिलं होतं. हा सिनेमा फक्त 133 मिनिटांचा होता. 

किशोर कुमारने 'शहनाई' या सिनेमात पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. सिनेमाची कथा जमीनदाराची मुलगी इंदुमती आणि जमीनदार ते मुन्शी राधाकृष्ण यांच्याभोवती फिरणारी आहे. देशभरातील सिनेप्रेक्षकांच्या हा सिनेमा पसंतीस उतरला होता. 'शहनाई'  सिनेमातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ना मेरी जान, मेरी जान, संडे के संडे सिनेमातील ही गाणी चांगलीच गाजली.'शहनाई' या बहुचर्चित सिनेमासह 'मेरे गीत' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. 'मेरे गीत' या सिनेमात सुशील कुमार आणि ज्युनिअर नसीम मुख्य भूमिकेत होते. 1947 मध्ये 100 हून अधिक सिनेमे प्रदर्शित झाले. पण त्यापैकी शहनाई, दो भाई, जुगनू हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले.  
यावर्षीही 15 ऑगस्टला प्रेक्षकांना अनेक दर्जेदार सिनेमे पाहायला मिळणार आहेत. 15 ऑगस्टला सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिनेमा यशस्वी होतो हे निर्मात्यांनाही कळलं आहे. त्यामुळे या दिवशी अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. यंदाही सनी देओलचा  'गदर 2' आणि अक्षय कुमारचा  'ओएमजी २ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.


शहनाई' हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारतात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा