बातम्या

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जेष्ठ शिवसैनिकांना साद

Shiv Sena office bearers congratulate senior Shiv Sainiks


By nisha patil - 7/15/2024 7:35:37 AM
Share This News:



कोल्हापूर  शिवसेनेत झालेल्या क्रांती नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिक शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करणाऱ्या मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी राहिले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानून आजही प्रत्येक शिवसैनिक काम करत आहे. संघटनेत जरी दुरी निर्माण झाली असली तरी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसाठी दुरावलेल्या जेष्ठ शिवसैनिकांनी साथ द्यावी; अशी साद राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील जेष्ठ शिवसैनिकांना दिली.
  

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील जेष्ठ शिवसैनिकांच्या भेटी घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याची सुरवात आज करण्यात आली. शहरातील प्रमुख जेष्ठ शिवसैनिकांच्या घरी पदाधिकाऱ्यांनी भेट देवून जुन्या आठवणींना उजाळा दिलाच यासह त्यांना शिवसेनेच्या कार्यात पुन्हा सामील होण्याची साद घातली.
  

 शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्व अंगिकारून जिल्ह्यातील शिवसैनिकांनी हालअपेष्टा सहन करत शिवसेनेचे रोपटे वाढविले. त्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले असून, जेष्ठ शिवसैनिकांनी घेतलेले कष्ट आजच्या नव्या पिढीच्या शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे. पण, दुसरीकडे पाहता ज्या शिवसेनाप्रमुखांनी अखंड आयुष्य कॉंग्रेसच्या तत्वांना, विचारांना आपल्या ठाकरी बाण्याने विरोध केला त्याच कॉंग्रेस सोबत मांडीला मांडी लावून बसणे, कॉंग्रेसी विचारांचे अनुकरण करणे, हिंदू देव-देवतांच्या अपमानास समर्थन देणे या घटनांमुळे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना मूठमाती दिल्याचे चित्र निर्माण होत आहे. पण, मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे संपूर्णत: शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत असल्याचे अखंड महाराष्ट्र पाहत आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना खऱ्या अर्थाने जपणाऱ्या मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेस साथ द्यावी, अशी साद शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ शिवसैनिकांना घातली आहे.
  

 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, किशोर घाटगे, सुनील खोत, राहुल चव्हाण, राज जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
 


शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जेष्ठ शिवसैनिकांना साद