बातम्या
शिवसेनेचे सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबीर संपन्न
By Administrator - 3/17/2024 6:34:07 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रचारासाठी सोशल मिडीया हे माध्यम प्रभावी ठरणार आहे. आधुनिक काळात प्रचार यंत्रणांच्या बदलेल्या प्रणालीचा योग्य वापर करून मतदारांपर्यंत पक्षाचे काम पोहचविण्याचे आव्हान शिवसैनिकांनी पेलावे लागणार आहे.
सोशल मिडीया हे निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख साधन असून, विविध अॅपद्वारे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शिवसेनेची ध्येयधोरणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनहिताचे काम आणि युती सरकारचे लोकोपयोगी निर्णय सोशल मिडीयाच्या माध्यमातून तळागाळात पोहचवा, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केले.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने राज्यभर सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठीचे शिबीर आज सकाळी १० ते २ या वेळेत संपन्न झाले. या शिबिरासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, आजच्या घडीला ८० टक्के लोकांकडे आधुनिक मोबाईल आहेत. त्यावर व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर सारखी दैनंदिन वापरातील सोशल मिडीया साधने उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट व्हायरल करायची असेल तर काही सेकंदात हजारो - लाखो लोकांपर्यंत ती पोहचविण्याची ताकद सोशल मिडीया मध्ये आहे. त्यामुळे निवडणुकीत याचाझद फायदा घेवून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार, शिवसेनेची ध्येयधोरणे, मुख्यमंत्री यांचे जनहिताचे काम आणि युती सरकारचे लोकोपयोगी निर्णय नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात सोशल मिडिया हे साधन उपयुक्त ठरणार आहे. यासह प्रचाराची रूपरेषाही प्रसारित करता येणार आहे. सोशल मिडीयाद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफवांना जागच्या जागी मूठमाती देवून पक्षाचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. सद्याच्या घडीला विरोधकांकडे टिके शिवाय दुसरे काम शिल्लक नाही तर आपल्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले जनहिताचे निर्णय कामाच्या रूपाने दिसतील हाच दोन्हीतील फरक नागरिकांपर्यंत न्या, कोल्हापुरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचेच असून, यावर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविण्यास सज्ज व्हा, अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेत कोणतेही गट - तट नाहीत. पक्ष देईल ते काम आदेश मानून काम करा. शिवसैनिकांची मोट आगामी काळात विरोधकांना चीतपट करेल. राज्याएकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करू, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर शिवसेना बाळासाहेब भवनचे सोशल मिडिया समन्वयक सुमित शेलार यांनी, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होते त्याचपद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचेही कोल्हापूर लाडक आहे. गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूरच्या विकास कामाला दिला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशनही कोल्हापुरातच घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूरवासियांवरील विश्वास अधिक दृढ झालेला दिसून येतो. आगामी निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडणून आणण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या शिवसैनिकांवर असून, सोशल मिडीयाच्या माध्यमातून शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजय करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. यानंतर
सुमित शेलार यांनी सोशल मिडीया कार्यकर्ता कार्यशाळा शिबीर अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपक्रमांची आणि सोशल मिडिया वापरण्याच्या पद्धतीची सविस्तर माहिती शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना दिली.
या शिबिरात युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, मंडलिक कारखाना संचालक वीरेंद्र मंडलिक, महिला आघाडी शहरसंघटिका अमरजा पाटील, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. निवेदन जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांनी केले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, उदय भोसले, किशोर घाटगे, प्रा.शिवाजी पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राजू हुंबे, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक पूजा भोर, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, सुनिता भोपळे, गीता भंडारी, शहर समन्वयक सुनील जाधव, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, विश्वदीप साळोखे, विपुल भंडारे आदी शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी, रिक्षा चालक सेना, फेरीवाले सेना, कामगार सेना, अनुसूचित जाती जमाती सेना सह सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे सोशल मिडिया कार्यकर्ता कार्यशाळा शिबीर संपन्न
|