बातम्या

२८ तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर

Shiv Sena to file official nomination form on 28th


By nisha patil - 10/22/2024 11:34:48 AM
Share This News:



कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार आणि मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पुन्हा विराजमान होणार यात तिळमात्र शंका नाही. परंतु, शिवसैनिकांनी गाफील राहून चालणार नाही. रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सतर्क राहून आपली जबाबदारी पार पाडावी. उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे पण आपली उमेदवारी गेल्या अडीच वर्षापूर्वीच फायनल झाली असून, येत्या २८ तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी पेठ पदाधिकारी मेळाव्यात प्रचाराचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विभागवार मेळावा आयोजित करण्यात आले आहेत. आज छत्रपती शिवाजी मंदिर येथे शिवाजी पेठेतील पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. 

    यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले कि, गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला न्याय दिला. कोल्हापूर साठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. लाडकी बहीण सारख्या योजनेतून महिलांचे सक्षमीकरण केले. मुलीना मोफत शिक्षण, महिलांना एसटी प्रवासात निम्मे तिकीट, वृद्धांना वयोश्री योजना अशा योजना राबविण सर्वसामान्यांचे सरकार चालविले. हेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सिद्ध करते. या योजनांसह कोल्हापूर शहराच्या विकासात होणारी भर या कामांची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचा. निश्चितच शिवाजी पेठ आणि शिवसेनेचे नात असून कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ शिवाजी पेठेतून रोवली गेली आणि आजही शिवसेनेचा धनुष्यबाणच शिवाजी पेठ वासीयांच्या मनावर कोरला गेला आहे यात शंका नाही. त्यामुळे गांधी मैदान, रंकाळा तलाव आदी प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्तव्य समजतो. शिवाजी पेठेच्या आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे ध्येय आपण ठेवले असून, हे ध्येय पूर्ण करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला. 

    यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्गक्रमण करत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र आम्ही जपला आहे. त्याचपद्धतीने राजेश क्षीरसागर यांचे काम सुरु आहे. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय इतर लाटण्याचा प्रयत्न करतात पण कोल्हापूरच्या जनतेसमोर त्यांचे पितळ उघडे पडत आले आहे. टीका-टिप्पणी पेक्षा कामाला महत्व देणारे राजेश क्षीरसागर हेच कोल्हापूर उत्तरच खर उत्तर आहेत. त्यांना शिवाजी पेठ परिसरातून प्रचंड बहुमताने मताधिक्य देवू, अशी ग्वाही दिली.

    यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजीराव जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, युवासेना शहरप्रमुख मंदार पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, सौ.सरिता हारुगले, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, योगेश चौगले, धनाजी कारंडे, सचिन राऊत, अमित चव्हाण, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, रुपेश इंगवले, भाऊ गायकवाड, शैलेश साळोखे, सुनील भोसले, शुभम शिंदे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


२८ तारखेला शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरणार : राजेश क्षीरसागर