बातम्या

शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

Shiv Senas anniversary is celebrated with various social activities


By nisha patil - 6/19/2024 8:42:29 PM
Share This News:



कोल्हापूर दि.१९ : शिवसेना नावात शक्ती आहे. कारण शिवसेना हा नुसता राजकीय पक्ष नसून शिवसेना हा विचार आहे. जनसामान्यांच्या भावना शिवसेनेशी जोडल्या असून, हे विचार, भावना आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शक्ती अजरामर आहे न संपणारी आहे. शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना कोल्हापूरच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे बाळकडू दिले आहे. त्याच विचारानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्यावतीने अखंडितपणे समाजकार्य सुरु आहे. हाच समाजकार्याचा वसा शिवसेनेच्या वर्धापनदिनीही अविरत सुरु ठेवण्यात आला. कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान, बालसंकुलातील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कार्यक्रम असे सामाजिक उपक्रम राबवून शिवसैनिकांनी वर्धापन दिन साजरा केला. शहरात शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे युवा नेते पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यासह  वेताळ तालीम शिवाजी पेठ, राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी, तटाकडील तालीम शिवाजी पेठ,  उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम या ठिकाणी विभागीय रक्तदान शिबिरे पार पडली. या रक्तदान शिबिरास शिवसैनिकांसह भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरास सीपीआर ब्लड बँक, अर्पण ब्लड बँक, वैभवलक्ष्मी ब्लड बँक,  संजीवन ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.

यासह गोरगरिब आणि गरजू नागरिकांना सीपीआर चौक येथील कोल्हापुरी थाळी येथे मोफत अन्नदान करण्यात आले. यावेळी युवानेते पुष्कराज क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उपशहरप्रमुख अशोक राबाडे, पापा प्रभावळकर आदी उपस्थित होते. मुक्तसैनिक जाधववाडी कदमवाडी विभागाच्या वतीने प्रिन्स विद्यालयाच्या परिसरात ५८ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी अमर क्षीरसागर, विनय वाणी, बंडा माने, अभिजित कुंभार, प्रमोद कुंभार, अभिजित ढेरे, मुन्ना तोरस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते. सायंकाळी युवासेनेच्या वतीने मंगळवार पेठ येथील बालसंकुलामधील विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी जादुगर नजीर बावडेकर यांच्या जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते.


शिवसेनेचा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा