बातम्या
इंद्रधनुषमध्ये शिवाजी विद्यापीठ उपविजेता
By nisha patil - 3/16/2024 12:53:26 PM
Share This News:
इंद्रधनुषमध्ये शिवाजी विद्यापीठ उपविजेता
शोभायात्रेसह तीस कलाप्रकारांचे पारितोषिक वितरण
छत्रपती संभाजीनगर, : गेल्या अनेक वर्षापासून इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे विजेतेपद जिंकण्याची परंपरा मुंबई विद्यापीठाने अबाधित राखली. तर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाने अनपेक्षितपणे पुणे विद्यापीठाला मागे टाकून उपविजेतेपदी मुसंडी मारली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि.१५) नाटयगृहात झाला. या महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाने शोभायात्रेसह विविध कलाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून उपविजेतेपदापर्यंत मजल मारली.
शिवाजी विद्यापीठाची महोत्सवातील कामगिरी अशी- सांस्कृतिक शोभा यात्रा (प्रथम क्रमांक), स्थळ छायाचित्रण (प्रथम), स्थळ चित्रण (प्रथम), कातर काम (प्रथम) भारतीय समूहगीत (प्रथम), मातीकाम (द्वितीय), शास्त्रीय नृत्य -(द्वितीय), सुगम गायन (द्वितीय), पश्चिमात्य वाद्य वादन (द्वितीय), लघुपट (तृतीय), नाट्यगीत गायन (तृतीय), सांघिक रचनाकृती (तृतीय) आणि कला विभाग फिरता करंडक (सांघिक उपविजेते).
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. प्रकुलगुरु डॉ. वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, अॅड.दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजभवन निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.प्रमोद पाब्रेकर, वित्तीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.गोविंद कतलाकुटे, सदस्य डॉ. राजाराम गुरव, डॉ.संदीप आडोळे, डॉ.वाणी लातूरकर, डॉ.दीपक नन्नवरे मंचावर उपस्थित होत. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक तर संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी आभार मानले . सोहळ्याचे बहरदार सूत्रसंचालन डॉ. प्रेषित रुद्रवार व डॉ. समाधान इंगळे यांनी केले. २० वा इंद्रधनुष्य महोत्सव ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे होणार आहे.
कलेला सामाजिक कार्याची जोड द्या : सोनाली कुलकर्णी
समाजमाध्यमांसह परंपरागत माध्यामातील कलावंताना आज चांगले दिवस आले आहेत. आजुबाजुला असलेल्या माणसांकडून प्रेरणा घेऊन उत्तम कलावंत व्हा. तसेच कलेला सामाजिक कार्याची जोड द्या, असा मोलाचा सल्ला प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दिला. मराठवाडा ही पाहुण्यांना आपुलकीची वागणूक देतो, याचा प्रत्यय यजमान विद्यापीठाने दाखवून दिल्याचा उल्लेख ही त्यांनी केला. सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी आपल्या जडणघडणीतील अनेक प्रसंग सांगितले. आपल्या संपुर्ण चित्रपट कारकिर्दीत रमाबाई आंबेडकर व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या भुमिका आपणास माती आणि समाजाशी नाळ कायम ठेऊन गेल्याचेही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.
कलाप्रकार निहाय उत्कृष्ट संघ
- चॅम्पीयन ट्रॉफी सर्वसाधारण विजेता संघ (राधाबाई वसंतराव रांगणेकर सर्वसाधारण विजेता संघ फिरते चषक द्वारा श्री.विनायक दळवी) - मुंबई विद्यापीठ, मुंबई
-- रनर्सअप ट्रॉफी (सर्वसाधारण उपविजेता संघ ) (चंद्रकांत यशवंत बांदेकर सर्वसाधारण उपविजेता संघ फिरते चषक द्वारा श्री आदेश बांदेकर) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
१. संगीत विभाग उत्कृष्ट संघ - मुंबई विद्यापीठ
२. नृत्य विभाग उत्कृष्ट संघ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
३. नाटय विभाग उत्कृष्ट संघ - मुंबई विद्यापीठ, मुंबई
४. वाड्ःमय विभाग उत्कृष्ट संघ - सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
५. ललित कला विभाग उत्कृष्ट संघ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
इंद्रधनुषमध्ये शिवाजी विद्यापीठ उपविजेता
|