बातम्या
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी मिळवले २ लाखांचे बीजभांडवल
By neeta - 7/2/2024 11:30:03 AM
Share This News:
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याकरिता महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंज से आयोजन करण्यात आले होते या चॅलेंज मधून शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागाच्या दोन विद्यार्थिनींना आपल्या नवसंकल्पनांकरिता दोन लाखाचे बीज भांडवल व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले. प्रजासत्ताक दिनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व प्रत्येकी रुपये एक लाख बीज भांडवल देऊन गौरविण्यात आले.
सदर महाराष्ट्र स्टुडन्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये तंत्रज्ञान अधिविभागातील दिशा बोंगार्डे (तृतीय वर्ष, फूड टेक्नॉलॉजी) व आदिती रानमाळे (प्रथम वर्ष, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी) या विद्यार्थिनींनी तंत्रज्ञान अधिविभागातील सहाय्यक प्राध्यापक हर्षवर्धन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नवसंकल्पना सादर केल्या होत्या.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू प्रा. (डॉ). प्रमोद पाटील यांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सदर स्पर्धेतील यश शिवाजी विद्यापीठासाठी नक्कीच आनंदाची बाब असून विद्यार्थ्यांनी समाजाच्या तळागाळातील विविध प्रश्नांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी समस्या समाधान शोधले पाहिजे, असे कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले. अशा नवसंकल्पनांना पाठबळ देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. (डॉ.) एस. एन. सपली, हर्षवर्धन पंडित उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी मिळवले २ लाखांचे बीजभांडवल
|