बातम्या
शिवाजीच्या मृत्यूने पोर्ले गाव दुखात संघर्षाची दुर्दैवी अखेर
By Administrator - 3/17/2024 6:32:12 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे पन्हाळा :प्रतिनिधी पोर्ले तर्फ ठाणे ता.पन्हाळा येथील उसाची बैलगाडी भरताना तोल जाऊन मानेवर पडलेल्या बैलगाडीवान शिवाजी खंडू पाटील ऊर्फ मालेकर(वय ५३) या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अठरा विश्व दारिद्र्यात जन्माला आलेल्या शिवाजी ची घरची परिस्थिती हालाखीची होती. रोजगार केला तरच चुल पेटायची अशा बिकट परिस्थितीत त्यांना सात मुलीच आहेत. आयुष्यभर परिस्थितीशी झगडत जीवनाचे दुःख विसरून हसत-खेळत जगणाऱ्या शिवाजी यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्या आईने गावाची धुणी-भांड्यांची कामे करून तीन पोरांचा सांभाळ केला, अशी गावाची हौसाक्का. तिचा दुसरा मुलगा म्हणजे शिवाजी. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मालेकरांच्या कुटुंबाच्या पाचवीला कष्ट पूजलेले. काबाडकष्ट करणारा शिवाजीचा स्वभाव हसरा असल्यानेजीवनातील संघर्षाचे चटके चेहऱ्यावर कधीही उमटू दिले नाहीत. ते उतरत्या वयाला लागले, तरी संकटांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. रोजगार आणि गावाची शेती पिकवून कुटुंब चालवायचा. शिवाजी यांनी दालमिया कारखान्याला ऊसतोडन नेण्यासाठी बैलगाडी केली. ऊस तोडायला गडी मिळाला नाही म्हणून दुपारचा ऊस तोडायचा आणि सकाळी ऊस मालकाच्या मदतीने बैलगाडी भरायची. कामाच्या व्यापात त्याने शरीराकडे दुर्लक्ष केले तेच जिवावर बेतले. कष्टाच्या नादात जिवाकडे दुर्लक्ष झाले आणि उसाच्या फडात बैल गाडी भरताना त्यांचा तोल जाऊन ते गाडीवरून खाली पडले, आणि ते बेशुद्ध पडले.त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.कष्टाने जगणाऱ्या शिवाजीचा मृत्यू झाला आणि सारा पोर्ले परिसरात हळहळ व्यक्त केली.
शिवाजीच्या मृत्यूने पोर्ले गाव दुखात संघर्षाची दुर्दैवी अखेर
|