बातम्या
शासनाच्या उपक्रमांची पदरमोड करून समाजजागृती
By nisha patil - 8/2/2024 10:34:57 PM
Share This News:
शासनाच्या उपक्रमांची पदरमोड करून समाजजागृती
सांगरुळच्या चंदू पेंटरचा आदर्शवत उपक्रम
सांगरूळ /वार्ताहर शासन दरवर्षी समाज हिताचे विविध उपक्रम राबवत असते .या उपक्रमांच्या प्रसारासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करत असते .पण सांगरूळ (ता . करवीर ) येथील चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर आपल्या अंगी असणाऱ्या कलेच्या माध्यमातून स्वखर्चाने अल्प खर्चिक वस्तूंचा वापर करून विविध प्रकारच्या आकर्षक कलाकृती तयार करून दरवर्षी शासकीय उपक्रमांचे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहेत .नुकतीच त्यांनी भल्या मोठया हत्तीची प्रतिकृती तयार केली असून त्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करत आहेत .
चंदू पेंटर यांनी हत्तीची भली मोठी प्रतिकृती तयार केली आहे . पर्यावरण संवर्धनाचे व पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारी विविध घोषवाक्य असलेले मोठे डिजिटल प्रिंट करून ती त्या प्रतिकृतीवर झूल टाकल्याप्रमाणे टाकली आहे .यावरती झाडे लावा प्रदूषणाला आळा घाला .वृक्ष संवर्धन करा पर्यावरणाचे रक्षण करा .पाणी वाचवा पाणी जिरवा .काटकसरीने पाण्याचा वापर करा . रासायनिक खते टाळा सेंद्रिय शेती करा जमिनीचे रक्षण करा .असे समाज प्रबोधन पर संदेश दिले आहेत .
नुकताच राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावोगावी विविध कार्यक्रम आयोजित केले होते .शक्य असेल त्या गावात जाऊन तेथील कार्यक्रमांमध्ये सामील होऊन चंदू पेंटरनी या हत्तीच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे . उपस्थितातूनही त्यांच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे .
सांगरुळ (ता . करवीर )येथील चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर विविध प्रकारची पेंटिंगची कामे करत असतात यातूनच ते आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत .आपल्या कामातून वेळ काढून एक छंद म्हणून ते वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम गेले कित्येक वर्षे करत आहेत . समाज प्रबोधनाचे शासनाने आतापर्यंत जे उपक्रम राबवले गेले आहेत त्या उपक्रमांचे प्रबोधन करण्यासाठी चंदू पेंटरने वेगवेगळ्या कलाकृती तयार केले आहेत .त्या कलाकृतींचा वापर करत विविध सण उत्सव व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी समाज प्रबोधनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे . आतापर्यंत त्यांनी साक्षरता अभियान दारूबंदी हुंडाबळी ग्रामस्वच्छता अभियान याचबरोबर मतदार जागृती यासारख्या शासनाच्या सर्व उपक्रमांचे कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे . विविध तरुण मंडळे व सामाजिक संस्थांच्या मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मध्ये त्यांची कलाकृती अल्प प्रमाणात मानधन देऊन निमंत्रित केली जाते . त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे
समाज जागृतीसाठी धडपड
शासनाच्या योजना या समाजाच्या व ग्रामीण भागाच्या विकासाच्या असतात .त्याची माहिती तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे .आपल्या अंगी असणाऱ्या कलेच्या माध्यमातून मी हे काम प्रामाणिकपणे करत आहे .मला लहानपणापासून सांगरूळचे ज्येष्ठ शिल्पकार स्व. गणपतराव जाधव गुरुजी यांचे शिल्पकला व चित्रकला यांचे मार्गदर्शन लाभले आहे .कलेचा वापर उदरनिर्वाह बरोबरच समाजप्रबोधनासाठी करायचा हा वारसा मी त्यांच्याकडून घेतला आहे .
चंद्रकांत जंगम सांगरूळ
शासनाच्या उपक्रमांची पदरमोड करून समाजजागृती
|