बातम्या

सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा सतेज पाटील : काँग्रेसच्या सहा आमदारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Solve problems of Sarathis research students Satej Patil


By nisha patil - 11/18/2023 6:32:47 PM
Share This News:



कोल्हापूर : राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२२ पर्यंत केवळ मुलाखत घेऊन सरसकट फेलोशिप देण्यात आली होती. मात्र, २०२२-२३ या वर्षात काढण्यात आलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची अट घातली आहे. शिवाय केवळ ५० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्यात येणार असल्याचे नमुद आहे. परिणामी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे २०२३ मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील, आ.पी.एन.पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगांवकर व आ.राजू आवळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. मराठा समाजातील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील  विद्यार्थी ३० ऑक्टोबरपासून सारथीच्या विभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांची आमदार सतेज पाटील यांनी ९ नोव्हेंबरला भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याची ग्वाही दिली होती. त्याअनुषंगाने आ.सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. 
पत्रात म्हंटले आहे की, २०१९ ते २०२१-२२ या कालावधीत सरसकट फेलोशिप दिली.पण २०२३ मधील नोंदणीकृत विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकपासून फेलोशिप मिळावी, २०२३ मध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी, सरसकट फेलोशिपचा निर्णय होईपर्यंत सीईटी परीक्षा स्थगित करण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर विचार करून शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करावी.


सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा सतेज पाटील : काँग्रेसच्या सहा आमदारांची मुख्यमंत्र्याकडे मागणी