बातम्या

जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी १२ जुलै रोजी विशेष शिबिर

Special Camp on 12th July for Completion of Caste Validity Certificate Errors


By nisha patil - 10/7/2024 11:25:02 PM
Share This News:



 मुंबई शहर जिल्ह्यातील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शासकीय /निमशासकीय सेवेतील कर्मचा-यांसाठी त्रुटी पूर्तता शिबिर शुक्रवार १२ जुलै २०२४ रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, मुंबई शहर, पंचशील एम-1, तळमजला, सिध्दार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा, मुंबई-४०० ०१९ येथे आयोजित करण्यात आले आहे. अर्जदारांनी या शिबिराचा अधिकाधिक लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर समिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

            शैक्षणिक प्रयोजनार्थ जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावाचे अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया नजिकच्या कालावधीत सुरु होत आहे. तरी वि‌द्यार्थी, शासकीय/निमशासकीस सेवेतील कर्मचारी इ. अर्जदारांनी या त्रुटी पूर्तता शिबिराचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

            जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरीता समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी विहीत वेळेत समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता समितीकडे अर्ज सादर केलेले नाहीत त्यांनी ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे. त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता त्वरित अर्ज सादर करावेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहर या समितीमार्फत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही, अशा वि‌द्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. त्याची एक प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करावी, असे समितीच्या अध्यक्ष अनिता वानखेडे, उपायुक्त तथा सदस्य सलिमा तडवी, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी १२ जुलै रोजी विशेष शिबिर