बातम्या

श्रीपतराव बोंद्रे दादांनी कामातून इतिहास निर्माण केला: आमदार पी.एन.पाटील

Sripatrao Bondre Dada created history through work MLA PN Patil


By neeta - 12/28/2023 3:41:35 PM
Share This News:



कोल्हापूर: श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादांनी आपल्या कार्यातून आणि प्रचंड कामातून इतिहास निर्माण केला आहे, त्यांनी सर्व सामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी हे कार्य केले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार पी. एन. पाटील  यांनी केले. 
     कै श्रीपतराव बोंद्रे दादा आणि कै. विजयराव बोंद्रे बापू जयंती महोत्सवाच्या सांगता समारंभ आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
   प्रारंभी संस्था परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास व   श्रीपतराव बोंद्रे दादांच्या पुतळ्यास तसेच कै. विजयराव बोंद्रे बापू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     आमदार पी. एन. पाटील म्हणाले, श्रीपतराव बोंद्रे दादांनी शेती ,सहकार, राजकारण,समाजकारणातून प्रचंड मोठी काम केली. ते पंचवीस वर्षे आमदार, एक वेळा मंत्री होते.जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय दिला. त्यांचे हे काम सर्वांना प्रेरणादायी असे आहे. 
    ते म्हणाले की विजयराव बोंद्रे यांनी युथ काँग्रेसच्या माध्यमातून चांगले काम केले. त्यांचा मित्रपरिवार ही मोठा होता. शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम केले. यासाठी विविध उपक्रम राबवले. यापुढे संस्थेतील विविध नवीन शाखांचा विस्तार करून त्यांचे हे कार्य अखंडपणे सुरू ठेवावे. 
      प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले की गेले दहा दिवस दादा - बापूंच्या कार्याचे स्मरण म्हणून विविध कार्यक्रम, स्पर्धा शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत आणि शहाजी महाविद्यालयात होत आहेत.हा जयंती महोत्सव लोकोत्सव झाला आहे. दादा बापूंचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग झाला आहे. 
   शिवाजी विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे म्हणाले की, दादांनी अनेक संस्था, माणसे उभे केली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव दादा पाटील यांनी विविध धोरणात्मक निर्णय जाहीर केले. विनाअनुदानित तत्त्व देखील येथूनच डिक्लेअर करण्यात आले. या पाठीमागेही श्रीपतराव बोंद्रे दादांची दूरदृष्टी होती. 
    स्वागत,प्रास्ताविक व अहवाल वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एम.देसाई यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.पि.के.पाटील यांनी केले. आभार प्रा. आर. डी. मांडणीकर यांनी मांनले.
   विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीसे व प्रमाणपत्र देण्यात आली. ग्रंथदान श्रेष्ठदान, उपक्रमांतर्गत एक पुस्तक समाजासाठी या उपक्रमात गोळा झालेल्या 108 पुस्तकांची भेट सांगरूळ येथील उमेद फाउंडेशन ला देण्यात आली.
    या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कवठेकर, संस्थेचे अधीक्षक रुपेश खांडेकर, महाविद्यालयाचे अधीक्षक  मनिष भोसले, माजी प्राचार्य डॉ. शहा, प्रा.सुधाकर मानकर,रघुनाथ पाटील, सर्व शाखांचे प्रमुख , मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक ,प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. 
  श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या 103व्या जयंती निमित्त आज संस्था परिसरतील त्यांच्या पुतळ्यास अनेक मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  
दादा बापू जयंती महोत्सवानिमित्त आज झालेल्या रक्तदान शिबिरात 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ.डी.एल.काशीद पाटील व डॉ. प्रशांत पाटील यांनी याचे संयोजन केले .सीपीआर मधील रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी हे रक्त संकलन केले.


श्रीपतराव बोंद्रे दादांनी कामातून इतिहास निर्माण केला: आमदार पी.एन.पाटील