बातम्या

थेट टँकरमधूनच गॅसची चोरी पोलिसांनी या प्रकरणी एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Stealing of gas directly from the tanker


By nisha patil - 8/17/2023 6:55:40 PM
Share This News:



थेट टँकरमधून अवैध गॅस रिफिलिंग करुन ते व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणाऱ्या लोकांविरोधात औरंगाबाद शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. धोकादायक पद्धतीने टँकरमधून गॅस भरणाऱ्या तिघांना सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, जावेदखान मोहम्मद मुनाफ  शेख अफसर शेख बाबुमियाँ,  व कदीर शेख अब्दुल रज्जाक अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती  मिळाली होती लिंक रोड गोलवाडी शिवार येथे माऊली हॉटेलच्या बाजूला एका एचपी कंपनीच्या टँकरमधून गॅस सिलेंडरमध्ये चोरुन भरले जात आहे. त्यामुळे सातारा पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच, या पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली असता, लिंक रोडवर मोकळ्या जागेत अंधारात एक एचपी कंपनीचा टँकर (MH -12-NX –733) दिसला. तसेच, टँकरच्या बाजूला एक मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो क्रमांक (MH-20-EL-0520) उभा होता. तर, टेम्पोमध्ये व्यवसायिक वापराचे सिलेंडर ठेवलेले होते. यावेळी LPG ने भरलेल्या टँकरच्या पाईपला रबरी नळी लावून हा गॅस चोरुन नोझलद्वारे व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरत असताना तीनही आरोपी सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

आरोपींना ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी याची माहिती पुरवठा अधिकारी यांना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. पुरवठा अधिकाऱ्यांनी तीनही संशयित आरोपींकडे विचारपूस केली. तसेच, टँकरचालकाला विचारले असता त्याने सांगितले की, हा टँकर मुंबईतील गॅस कंपनीतून गॅस भरुन चिकलठाणा येथे एचपी गॅस डेपोमध्ये जात आहे. मात्र, आपण यातील आरोपी शेख अफसर शेख बाबु व कदीर शेख अब्दुल रज्जाक यांना रिकाम्या व्यवसायिक सिलेंडरमध्ये टँकरमधून 800 रुपयांमध्ये एक सिलेंडर याप्रमाणे गॅस भरुन देत असल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


थेट टँकरमधूनच गॅसची चोरी पोलिसांनी या प्रकरणी एकूण 52 लाख 68 हजार 883 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त