बातम्या

रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्या सावकारांना आळा घाला -

Stop loan sharks harassing rickshaw pullers


By nisha patil - 5/28/2024 7:57:19 PM
Share This News:



कोल्हापूर :प्रतिनिधी खाजगी सावकारी सारखे अवैध व्यवसाय जिल्ह्यात वाढत आहेत. चारच दिवसांपूर्वी एका खाजगी सावकाराने केलेल्या मारहाणीत राकेश माने या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात खाजगी सावकारीच्या पाशात अडकून मृत्युमुखी पडलेला हा तिसरा रिक्षाचालक आहे. याआधी फुलेवाडी येथील अमित पाटील व बोन्द्रेनगर येथील प्रीतम पाटील या तरुण रिक्षाचालकांनी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली आहे. खाजगी सावकरीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी रिक्षाचालक संघटनेने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

बदनामीच्या भीतीने अनेकजण याबाबत पोलिसांना कळवत नाहीत. त्यामुळे पीडित रिक्षाचालकांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे जाहीर आवाहन पोलिसांनी आपल्या स्तरावरून करावे, तसेच अशा प्रकारचे अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी पोलीस यंत्रणेने सक्षम पावले उचलून रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्या अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.

यावर जयश्री देसाई यांनी जिल्ह्यातील संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत कळवू, तसेच असे प्रकार घडत असल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्याचे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शहराध्यक्ष उत्तम पाटील, रिक्षा आघाडी अध्यक्ष संजय नलवडे, मंगेश मोहिते, अरुण तिवले, कय्युम पठाण आदी उपस्थित होते.


रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्या सावकारांना आळा घाला -