बातम्या
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचे लवकरच होणार निर्बीजीकरण
By nisha patil - 4/9/2023 5:35:31 PM
Share This News:
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचे लवकरच होणार निर्बीजीकरण
राजू नदाफ यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी : प्रतिनिधी इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढून नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे या कुञ्यांवर निर्बीजीकरणची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या मोहिमेनंतर भटक्या कुत्र्यांची वाढ कमी होऊन त्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी स्पष्ट केले. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजू नदाफ यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर तक्रार करुन त्याचा योग्य पाठपुरावा केला असून त्याला अपेक्षित यश आले आहे.
सध्या इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढून त्यांचा उपद्रवही वाढला आहे. शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढून नागरिकांना विशेषतः महिला व लहान मुलांचा जीव टांगणीला लागला आहे.त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.याबाबत अनेकवेळा आंदोलनेही केली आहेत, मात्र त्याबाबत ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राजू नदाफ यांनी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेने याची गांभीर्याने दखल घेऊन याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली आहे.भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली असून यामध्ये १५०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच संबंधित मक्तेदारास कार्यादेश देऊन निर्बिजीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे, असे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचे लवकरच होणार निर्बीजीकरण
|