बातम्या

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील : आमदार आवाडे

Striving for justice rights of Anganwadi workers MLA Awade


By nisha patil - 1/18/2024 11:50:47 AM
Share This News:



अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील : आमदार आवाडे

इचलकरंजी : प्रतिनिधी  जीवाची पर्वा न करता घरोघरी जावून माहिती गोळा करण्याचे काम करण्यासह शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहचविणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना मानधन वाढ मिळालीच पाहिजे. या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविला असून मानधनात वाढ मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असून शासन त्यांना शासकीय कर्मचार्याचा दर्जाही देत नाही. त्यामुळे कायद्याचे संरक्षण, महागाई भत्ता यासह अन्य लाभही मिळत नाहीत. परिणामी अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतनश्रेणी, भत्ते, पूर्वलक्षीप्रभावाने द्यावेत, इतर राज्यातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन द्यावे, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, लोकसंख्या वाढलेल्या भागात नवीन अंगणवाडी सुरू करावी यासह विविध मागण्या प्रलंबित असून त्याच्या पूर्ततेसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन हा प्रश्‍न शासन दरबारी मांडून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
 

चर्चेनंतर बोलताना आमदार आवाडे यांनी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ होणे गरजेचे आहे. या संदर्भात आपण विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. मानधन वाढ झालीच पाहिजे या मतावर मी आजही ठाम असून हा प्रश्‍न शासन दरबारी मांडून तो सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव सुवर्णा तळेकर आणि संघटक सुनिल बारवाडे आदी उपस्थित होते.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नशील : आमदार आवाडे