विशेष बातम्या
विद्यार्थी प्रवेशतस्करी शिक्षणक्षेत्रातील गंभीर बाब: डॉ. एकनाथ आंबोकर यांचे परखड मत
By nisha patil - 7/4/2025 9:08:50 PM
Share This News:
विद्यार्थी प्रवेशतस्करी शिक्षणक्षेत्रातील गंभीर बाब: डॉ. एकनाथ आंबोकर यांचे परखड मत
कोल्हापूर: अलीकडे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरू असलेली तस्करी ही शिक्षण क्षेत्रातील अतिशय गंभीर बाब आहे. यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिला.
मी एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी हॉलमध्ये आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश तस्करीविषयी स्पष्ट मत मांडले.
“३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ने-आण केली जाते. मात्र त्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा मूळ शाळेत परत येतात. यात काही खासगी अकॅडमी आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांचा सहभाग असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यशाळेत पुढील काळात मुख्याध्यापकांसमोर येणाऱ्या विविध आव्हानांचीही चर्चा झाली. “शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात मानसिक व व्यावसायिक परिवर्तन झाले नाही, तर त्यांचे 'देवत्व' लवकरच नष्ट होईल,” असे ते म्हणाले. आपल्या भाषणाचा समारोप त्यांनी कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तींनी केला.
कार्यशाळेदरम्यान, वही-पेन न आणलेल्या मुख्याध्यापकांना त्यांनी चांगलेच सुनावले. यावेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेतील विजेत्या शाळा आणि एन.एम.एम.एस परीक्षेत यश मिळवलेल्या शाळांचे सत्कार करण्यात आले.
कार्यशाळेत विविध अधिकारी व मार्गदर्शकांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले:
-
अजय पाटील: स्क्वॅफ मानांकनाबाबत विवेचन
-
अरुंधती जाधव: निपुण भारत अभियान कृती कार्यक्रम
-
डी.सी. कुंभार: पॅट परीक्षा आणि अध्ययन स्तर निश्चिती
-
डी.ए. पाटील: अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील मुद्दे
-
दिगंबर मोरे: संच मान्यता व पवित्र पोर्टलची माहिती
प्रास्ताविक समलोय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य चव्हाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी केले.
कार्यशाळेला कोळगावकर हायस्कूलचे संजय सौंदलगे, शशिकांत सावंत, विजय भोगम, धनाजी बेलेकर, वृषाली कुलकर्णी, अश्विनी पाटील यांच्यासह तब्बल 130 प्रमुख मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
विद्यार्थी प्रवेशतस्करी शिक्षणक्षेत्रातील गंभीर बाब: डॉ. एकनाथ आंबोकर यांचे परखड मत
|