बातम्या
सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या
By nisha patil - 9/3/2024 5:49:20 PM
Share This News:
राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाहीय. महाशिवरात्री च्या पहाटे कोगटा येथून आणखी एक वाईट बातमी मिळाली आहे. गुरुवारी एका विद्यार्थ्याने कीटकनाशक औषध खात आत्महत्या केली. अभिषेक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अभिषेक बिहारच्या भागलपूरचा रहिवासी होता आणि कोटा येथे जेईई मेनची तयारी करत होता.पोलिसांनी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून चौकशी केली असता, अभिषेक 29 जानेवारीला पेपर देण्यासाठीही गेला नव्हता. त्यानंतर 19 फेब्रुवारीला त्याचा पेपरही होता, मात्र तोही विद्यार्थी पेपर देण्यासाठी गेला नाही. पोलिसांनी अभिषेकच्या खोलीतून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माफ करा बाबा मी जेईई करू शकत नाही. पोलिसांनी मृत विद्यार्थी अभिषेकचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवला असून कुटुंबीयांना माहिती दिली आहे. कुटुंबीय आल्यानंतर अभिषेकच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात शिक्षणाचे शहर म्हणून ओळखले जाणारे कोटा आता विद्यार्थी आत्महत्येमुळे चर्चेत आहे. गेल्या वर्षी 29 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर या वर्षाच्या सुरुवातीलाच 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मात्र, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. हॉस्टेल आणि पीजी रूममधील पंख्यांमध्ये अँटी हँगिंग उपकरणे बसवली जात आहेत. शहराच्या नवीन एसपी डॉ. अमृता दुहान वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत. वसतिगृह चालक आणि कोचिंग संस्थांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही या वर्षीही कोटा येथील विद्यार्थी आत्महत्येच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
सुसाईड नोट लिहत विद्यार्थ्याची आत्महत्या
|