विशेष बातम्या
विद्यार्थ्यांनो, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 7/3/2025 10:54:55 PM
Share This News:
विद्यार्थ्यांनो, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर – "शिक्षण घेतल्यानंतर नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या," असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना केले. ते कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनमधील 30 व्या पदविका प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या समारंभात 371 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, "स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्त्व तयार करून आपल्या क्षेत्रात नवी ओळख निर्माण करा. ज्ञान, शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करून उंची गाठा."
कार्यक्रमाला सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव, कार्यकारी संचालक जयकुमार पारिख, प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांनी उद्घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात स्थापत्य, यंत्र, विद्युत, माहिती व तंत्रज्ञान, धातुशास्त्र, अणुविद्युत आणि दूरसंचार विभागातील पाच-पाच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आल्या.
कार्यकारी संचालक जयकुमार पारिख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, "शिकत राहा, चुकांतून शिका आणि नवीन एआय प्रणाली आत्मसात करून बाजारातील आपली किंमत वाढवा."
कार्यक्रमात प्राचार्य कॅप्टन डॉ. नितीन सोनजे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल 2024-25 सादर केला. त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि संचालक डॉ. विनोद मोहितकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. मालपुरे यांनी केले, तर प्रसिद्धी समितीचे कामकाज अमोल पाटील आणि विजय माणगावकर यांनी पाहिले.
विद्यार्थ्यांनो, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या – जिल्हाधिकारी अमोल येडगे
|