बातम्या
कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला
By nisha patil - 1/24/2024 7:49:25 PM
Share This News:
कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. त्यामुळे घराच्या अंगणातून आकाशाकडे डोळे करत विमान पाहण्यातच त्यांचा आनंद. त्यात बसण्याचं स्वप्न त्यांनी कधी पाहिलंही नसेल.पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने महापालिका शाळेतील १७ विद्यार्थ्यांना बंगळुरूमधील इस्रोला (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) भेट देण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापुरातून हे विद्यार्थी विमानाने जाणार असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना आकाश ठेंगणे झाले आहे.
शहरात महापालिकेच्या ५८ शाळा आहेत. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकत असल्याने मनपा शाळांबद्दल पालकांमध्ये विश्वासार्हता वाढली आहे. गतवर्षी ९४ विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले होते. यातील १७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आले होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे जरगनगर, नेहरूनगर, टेंबलाईवाडी, जाधववाडी या शाळांमधील आहेत. या विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवून आणली जाणार आहे. सामान्य घरातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानप्रवास करायला मिळत असल्याने हे विद्यार्थी आनंदून गेले आहेत. ५ फेब्रुवारीला हे विद्यार्थी कोल्हापुरातून विमानाने बंगळुरूला जातील. त्यानंतर ते इस्रो केंद्राला भेट देणार आहेत.
कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला
|