व्यवसाय

कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Submit a new proposal regarding land acquisition on Kolhapur


By nisha patil - 10/4/2025 2:45:24 PM
Share This News:



कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

- जिल्हाधिकारी यांना नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई  - कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा, तो मान्यतेसाठी केंद्राकडे पाठविण्यात येईल, असेही महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, महसूलचे अधिकारी आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करुन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक ‘१’ होता तो आता गुणांक ‘२’ करण्यात यावा. ज्यामुळे या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. शासनामार्फत यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. 

उपस्थित लोकप्रतिनिधींकडून महसूल मंत्र्यांचे आभार

उपस्थित लोकप्रतिनिधींनी आभार व्यक्त करून गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे असे सांगितले. मात्र, महसूलमंत्री बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरही तातडीने निर्णय घेण्याची तयारी दर्शविल्याने हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्यावतीने आभार मानण्यात आले.
 


कोल्हापूर – सांगली राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनासंदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Total Views: 21